श्रीक्षेत्र अक्कलकोट

          श्रीस्वामी समर्थांच्या पवित्र वास्तव्याने देवभूमी बनलेले अक्कलकोट हे फार प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सोलापूर पासून साधारणपणे २८ कि.मी. अंतरावर अक्कलकोट हे पूर्वीचे संस्थानिक जहागिरदारीचे गाव आहे. श्रीस्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते कर्दळिवनामध्ये प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याबाबत एक विलक्षण कथा सांगितली जाते. श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील दुसरे अवतार श्री. नृसिंह सरस्वती हे शके १४४० मध्ये श्रीशैल्य पर्वतावर कर्दळीवनात गुप्त झाले. तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी त्यांनी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. एक, दोन, दहा,वीस अशी ३०० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीरा भोवतीही एक प्रचंड मोठे वारुळ तयार झाले होते. ते वारुळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. काळाच्या ओघात गुहे भोवती पडझड होवून श्री नृसिंह सरस्वती जेथे समाधीमध्ये बसले होते ते ठिकाण औदुंबर, वटवृक्ष आणि अश्वत्थ  वृक्षाच्या जवळ आले होते. एके दिवशी एक चेंचु आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्रीनृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून बाहेर पडले. श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे त्यावेळचे रुप विलक्षण होते. ते दाशरथी राजाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांचे हात गुडघ्यापेक्षाही खाली पर्यंत होते. उंची सहा फुटांपेक्षा जास्त, विशाल छाती, रुंद खांदे, उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी अंगकांती, केळीच्या गाभांसारखे पाय, टोकदार नाक, भव्य कान आणि त्यातील तेजस्वी कुंडले, अत्यंत भेदक दृष्टी आणि कमळासारखे डोळे. हा प्रकार पाहून तो आदिवासी घाबरला आणी रडवेला होवून पून्हा पून्हा क्षमा मागू लागला. स्वामींनी त्याला अभयदान दिले आणि तेथून ते बाहेर पडले. हेच श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. श्रीनृसिंह सरस्वती ज्या कर्दळीवनात गुप्त झाले होते, त्याच कर्दळीवनातून श्रीस्वामींचे अवतारित्व प्रकटले. श्रीस्वामी समर्थांनी स्वत:च ‘मुळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतीस्थान आणि नाव नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरुप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे प्रत्येक दत्तभक्त हा स्वामी भक्त आहे.

          श्रीस्वामी समर्थांनी अखंड भारतात सर्वत्र संचार केला. विविध ठिकाणी ते विविध नावांनी ओळखले जात होते. त्याच्या अवतारकार्यामध्ये त्यांनी विलक्षण असे कार्य केले आहे. त्यांचा अवतार हा रुद्रावतार होता. ते माणिकनगरला श्रीमाणिकप्रभू यांच्याकडे जावून राहिले असल्याचा उल्लेख आहे. तसेच मुरगोड क्षेत्री ते चिदंबर दिक्षीत स्वामींच्या यज्ञ समारंभातही सहभागी झाले होते. तेथे त्यांनी तूप वाढण्याचे काम केले होते. ते चंचलभारती, संचारभारती या नावानेही ओळखले जात होते. स्वामी शके १७६१ रोजी मंगळवेढा येथे आणि शके १७७३ मध्ये मोहोळ येथे आले. त्यानंतर शके १७७९ साली ते अक्कलकोटला आले आणि अखेरपर्यंत म्हणजे शेवटची २१ वर्षे ते अक्कलकोट तेथेच रहात होते. त्यांच्या आगमनाने अक्कलकोट म्हणजे जणू दुसरे काशी क्षेत्र बनले. भक्तांच्या झुंडीच्या झुंडी या काळात तेथे आल्या. आणि त्यांनी स्वामींची कृपा प्राप्त करून घेतली. स्वामींनी त्यांच्या जीवनात अनेक अतर्क्य लीला केल्या. त्यांना राव रंक समान होते. प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सन्मार्गाला लावले. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचा उद्धार केला. श्रीस्वामींचे विशेष म्हणजे त्यांचा शिष्य संप्रदाय मोठ्या प्रमाणात तयार झाला. त्यांनी प्रत्येकाला बोध केला. त्यांच्या शिष्यांनी त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणावर वाढविले. सर्व जाती धर्मातील त्यांचे शिष्य होते. समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचा शिष्य समुदाय आला होता. त्यांनी संपूर्ण समाजात जणू आध्यात्मिक क्रांतीच घडवून आणली. श्रीस्वामी समर्थांचा प्रचार आणि प्रसार अगदी तळागाळात झाला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आजही त्यांच्या कृपेचा येत असलेला अनुभव. “हम गया नहीं…. जिंदा है….” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. त्याची अजूनही प्रचिती येत आहे.

          अक्कलकोट येथे सर्व प्रकारच्या सुविधा, भक्तनिवास आणि भोजनव्यवस्था उपलब्ध आहेत. प्रत्येक दत्तभक्ताने अक्कलकोट येथे जावून श्रीस्वामी कृपेची दिव्य प्रचीती घेतली पाहिजे.

श्रीवटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट, अक्कलकोट, जि. सोलापूर

फोन : (०२१८१) २२०३२१, भक्त निवास : २२१९०९   

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon