श्रीक्षेत्र अमरापूर

अमरेश्वर लिंग बरवे । त्यासी वंदोनी स्वभावे ।

पूजिता नरे अमर व्हावे । विश्वनाथ तोची जाणा ॥

अमरेश्वर सन्निधानी । वसती चौसष्ठ योगिनी ।

पूजा कराव्या माध्यान्ही । श्रीगुरुंजवळी येती नित्य ॥

          अमरापूर हे प्रति काशी असून तेथील अमरेश्वराचे महात्म्य श्रीकाशी विश्वेश्वराप्रमाणेच आहे. औदुंबरहून निघाल्यावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी अमरेश्वर येथे आले. कृष्णा-पंचगंगा संगम हे जणू प्रयाग तीर्थ असून पश्चिम तटावर औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरुंनी १२ वर्षे तपश्चर्या केली. अमरेश्वराचे हे स्थान फार प्राचीन असून श्रीगुरु तिथे येण्यापूर्वीही त्याचे महात्म्य होते. तेथे ५ मुखी, १० हात, जटेमध्ये गंगा, चंद्र, गळ्यामध्ये सर्प, भूषणे, सोबत पार्वती, गजानन आणि कार्तिकेय पुत्रांसह श्रीशंकर भगवान लिंग रुपाने वास करुन आहेत. तेथेच ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरुप श्रीदत्त अमरेश्वर स्वरुपात आहेत. याठिकाणी ६४ योगिनींचे मंदिर असून त्या रोज माध्यान्हकाळी श्रीनृसिंहस्वामी महाराजांना भिक्षा देत असत. वाराणसीनंतर संपूर्ण भारतात फक्त अमरापूर या ठिकाणी ६४ योगिनींचे मंदिर आहे. या ६४ योगिनींची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. गजानना २. सिंहमुखी३. गृधास्या४. काकतुंडिका ६. हयग्रीवा ७. वाराही ८. शरभानना ९.उलूकिका १०.शिवारावा ११.मयूरी १२. विकटानना १३. अष्टवक्रा १४. कोटराक्षी १५. कुब्जा १६. विकटलोचना १७. शुष्कोदरी १८. ललज्जिव्हा १९. श्वदंष्ट्रा २०. वानरानना २१. ऋक्षाक्षी २२. केकराक्षी २३. बृहतुंडा २४. सुराप्रिया २५. कपालहस्ता २६. रक्ताक्षी २७. शुकी २८. श्येनी २९. कपोतिका ३०. पाशहस्ता ३१. दंडहस्ता ३२. प्रचंडाचंडविक्रमा ३३. शिशुघ्नी ३४. पापहंत्री ३५. काली ३६. रुधिरपायिनी३७. वसाधया३८. गर्भकक्षा३९. शवहस्त४०. अंत्रमालिनी४१. स्थूलकेशी४२. बृहत्कुक्षि४३. सर्पास्या४४. प्रेतवाहना४५. दंदशूककरा ४६. क्रौंची४७. मृगशीर्षा ४८. वृषानना ४९. व्यात्तास्या ५०. धूमनि:श्वासा ५१. वोमैक ५२. चरणोर्ध्वद्दक ५३. तापनी ५४. शिषणीदृष्टि ५५. कोटरी ५६. स्थूलनासिका ५७.विद्युतप्रभा ५८.बलाकास्या ५९.मार्जारी ६०. कटपूतना ६१.अट्टाट्ठासा ६२. कामाक्षी ६३. मृमाक्षी ६४. मृगलोचना.

          अमरापूर गावची एक कथा गुरुचरित्रामध्ये आली आहे. अमरापूरमध्ये एक दत्तभक्त गरीब ब्राह्मण राहात होता. दारिद्र्यामुळे त्याला जगणे कठीण झाले होते. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. ज्या दिवशी भिक्षा मिळत नसे, त्या दिवशी त्याच्या कुटुंबातील लोक घेवड्याच्या शेंगा उकडून खात व पोट भरत असत.

          एके दिवशी श्रीदत्तगुरु त्याच्या दारी भिक्षेसाठी येऊन उभे राहिले. ब्राह्मणाने त्यांचे स्वागत केले. दुर्दैवाने त्या दिवशी घरात धान्याचा कणही नव्हता. तेव्हा त्या ब्राह्मणाने घेवड्याच्या शेंगांची भाजी करुन श्रीगुरुंना दिली. त्याच्या भक्तिभाव पाहून ते म्हणाले की, “ आजपासून तूझे दारिद्र्य संपले. ” ते घराबाहेर पडले. त्याच्या अंगणात घेवड्याचा वेल पसरला होता. वेलाच्या खालून जावे लागत असे. श्रीगुरुंनी तो वेलच उपटून टाकला. त्यामुळे पोट भरायचे त्याचे साधन नष्ट झाले. ब्राह्मणाची बायको, मुले रडू लागली. ते श्रीगुरुंना शिव्या शाप देऊ लागले. ब्राह्मण म्हणाला, “ आहे त्यात समाधान मानावे. श्रीगुरु सर्व जाणतात. त्यांनी वेल तोडून टाकला ही त्यांची मर्जी. ” तोडलेला वेल तो काढून टाकू लागला. कुदळीने त्याची मुळे उकरु लागला, तेव्हा त्या जागी त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. श्रीगुरुंनी सांगितल्या प्रमाणे त्याचे दारिद्र्य नाहिसे झाले.

          श्रीगुरु यती औदंबर वृक्षाजवळ राहतात, परंतु भिक्षा मागायला ते गावात येत नाहीत याचे लोकांना आश्चर्य वाटते. त्या परिसरामध्ये एक गंगानुज नावाचा शेतकरी राहात होता. तो एकदा शेतात काम करीत असताना त्याला अद्भुत दृष्य दिसले. श्रीगुरु नदीपात्राकडे निघाले आहेत. तेवढ्यात ६४ योगिनी पूढे आल्या आणि श्रीगुरुंना घेऊन निघाल्या. नदीपात्र बरोबर दुभंगले आणि त्या श्रीगुरुंना घेऊन गेल्या. त्यानंतर पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरु झाला. त्याच्या लक्षात आले की हे यती म्हणजे साक्षात भगवंत आहेत. दुसऱ्या दिवशी तो औदुंबर वृक्षाजवळ लपून बसला. योगिनी आल्या आणि त्या श्रीगुरुंना घेऊन जाऊ लागल्या. तेव्हा तोही त्यांच्या मागोमाग गेला. योगिनी श्रीगुरुंना घेऊन पाण्याखाली आपल्या नगरीमध्ये घेऊन गेल्या. तेथे त्यांनी श्रीगुरुंना सिंहासनावर बसवले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांना पंचपक़्वानांची भिक्षा प्रदान केली. तो दिव्य सोहळा पाहून गंगानूज थक़्क झाला. एवढ्यात श्रीगुरुंची नजर त्याच्यावर पडली. तेव्हा तो म्हणाला काल आपण नदीतून गुप्त झाल्याचे पाहिले. मला कुतूहल वाटले. म्हणून मी आज आपल्या मागोमाग आलो. मला क्षमा करा. त्याचा प्रामाणिकपणा आणि भोळा भाव पाहून श्रीगुरुंना समाधान झाले आणि त्यांनी त्याला आशिर्वाद दिला. एकदा त्याला आपल्या व्याघ्रासनावर बसवून श्रीगुरु श्रीक्षेत्र प्रयागाला घेऊन गेले आणि काशी विश्वेश्वराचे त्याला दर्शन घडवून परत आणले. अमरापूर क्षेत्री श्रीगुरुंनी अनेक लीला केल्या आहेत.

 

अमरापूर म्हणजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।

जैसा प्रयाग संगम । तैसे स्थान मनोहर ॥

वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरू ।

देव असे अमरेश्वरु । तया संगमा षटकूळी ॥

          भिलवडी प्रमाणेच अमरापूर येथे दोन्ही तीरांवर श्रीगुरुंचे वास्तव्य होते. प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांना हे स्थान अतिशय प्रिय होते. त्यांचे परमशिष्य श्रीनृसिंहसरस्वती दिक्षित स्वामी यांनी येथे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठाची स्थापना केली आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विविध ठिकाणी भ्रमंती आणि चातुर्मास करीत असताना जे लिखाण करीत ते अमरापूरला दिक्षितस्वामींकडे पाठवून देत असे. त्यांनीच ते सर्व साहित्य संकलित केले आहे. दिक्षित स्वामींचा अधिकार खूप मोठा आहे असे प. प. टेंबे स्वामी नेहमी म्हणत असत. अमरापूर महात्म्य सांगताना श्रीनृसिंहसरस्वती स्वामी म्हणाले आहेत.

          प्रयाग: संगम: ख्यात: काशिकात्वमरापुरी ॥

          गया तु गोपुरी ज्ञेया दक्षिणी त्रिस्थली स्मृता ॥

          याठिकाणी श्रीदत्त पादुका, प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुका आणि प. प. दिक्षितस्वामी महाराजांच्या पादुका आहेत. तसेच व्यासयंत्र आहे.

अमरापूर महात्म्य जाणून तेथे भेट दिली पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ,

श्रीदत्त अमरेश्वर मंदिर, अमरापूर- औरवाड

ता. शिरोळ जि. कोल्हापूर ४१६१०४

फोन: (०२३२२) २७०४४१

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon