श्रीक्षेत्र औदुंबर

          सांगली रस्त्यावर आष्टा या गावापासून ९ कि. मी. अंतरावर औदुंबर हे गाव आहे. सांगलीपासून २२ कि. मी. अंतरावर आहे. कृष्णेच्या तिरावर येथे दत्त मंदिर आहे. पलिकडील तीरावर भिलवडी हे गाव असून तेथील भुवनेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी यांचा जन्म कारंजा येथे झाला. ८ व्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वाराणसी येथे गेले. तेथून संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केले. तोपर्यंत त्यांची किर्ती चहूकडे पसरली होती. त्यामुळे त्यांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला हजारोंनी भक्तगण येत होते. असेच ते परळी वैजनाथ येथे आले. पण तेथेही भक्तांची रिघ लागली. तेव्हा ते तपस्येसाठी एकांत स्थळाचा शोध घेऊ लागले. कृष्णा नदीकाठी फिरत फिरत ते भिलवडी येथे आले. तेथे भुवनेश्वरी देवीचे त्यांनी दर्शन घेतले. सर्वत्र जंगल होते. कृष्णा नदीचा त्या किनाऱ्यावर डोह होता. तेथे सुसरींचा सुळसुळाट होता. त्यामुळे फारशी मनुष्यवस्ती नव्हती. नदीच्या दुसऱ्या तटावर त्यांनी एक औदुंबर वृक्ष पाहिला. त्यांना ती जागा आणि तिथला एकांत आवडला. त्यांनी तेथेच चातुर्मास करायचा ठरवला. अत्यंत रमणीय आणि निर्मनुष्य अशा त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांच्या तप:साधनेमुळे त्या एकांत आणि गुढ ठिकाणी जणू सत्त्व शक्ती एकत्र झाल्या. चालत्या बोलत्या परमेश्वराचे अस्तित्त्व अनुभवून तो परिसर धन्य झाला. श्रीगुरुही अतिशय आनंदामध्ये होते. श्रीगुरु आपल्या साधनेमध्ये गुंग होते. कुणाचाही त्रास नव्हता. दैवी आनंदामध्ये दिवस चालले होते.

अंकलखोप कृष्णातीरी । गुरु वसती औदुबरी ।

धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेये गुरुवर वसतसे ॥

एकदा अचानक एक विलक्षण गोष्ट घडली श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. एक मुलगा धावत आला आणि त्याने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. श्रीगुरुंनी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले. पण तो मुलगा बोलू शकत नव्हता. त्याने तोंड उघडले तेव्हा ते रक्तबंबाळ झाले होते. त्याची जीभ कापली होती. श्रीगुरुंनी अंत:र्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. तो मुलगा कोल्हापूर येथील एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा मुलगा होता. पण तो मंद बुद्धीचा होता. ते पाहून अतिशय दु:खाने त्याचे आई वडील जग सोडून गेले. त्यामुळे तो मुलगा अनाथ होऊन भटकू लागला. कदाचित उपनयन झाल्यावर तो सुधारेल म्हणून गावातील लोकांनी त्याची मुंज लावून दिली. परंतु त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. सर्वजण त्याची खिल्लि उडवत आणि त्याला मारझोड करीत असत. शेवटी तो गाव सोडून फिरत फिरत भूवनेश्वरी मातेच्या मंदिराजवळ आला. तिथे तो अन्नपाण्याशिवाय तीन दिवस देवीच्या समोर बसून राहिला. तरीही देवी प्रसन्न न झाल्यामुळे त्याने आपली जीभ कापून ती देवीला अर्पण केली आणि तो जीव देण्यासाठी कृष्णेच्या डोहाकडे निघाला. त्यावेळी देवी त्याला म्हणाली की तू समोरच्या तीरावरील औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या सद्गुरु यतींकडे जा. ते तुझा उद्धार करतील. आता तो श्रीगुरुंच्या पायाशी बसून अश्रू ढाळीत होता. श्रीगुरुंचे मन द्रवले. त्यांनी अतिशय प्रेमाने त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. त्याचबरोबर त्याची जीभ पूर्ववत झाली. त्याने श्रीगुरुंच्या चरणी विनवणी केली की मला ज्ञान द्या. श्रीगुरुंनी कृपा करुन त्याच्या मस्तकावर हात
ठेवला. तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले.

औदुंबर वृक्षाखाली कृष्णा नदीच्या तीरावर येथे  उघडा सभामंडप असून गाभाऱ्यामध्ये पादुका आहेत. या पादुकांना श्री विमल पादुका म्हणून ओळखले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या या प्रथम पादुका आहेत. विमल याचा अर्थ पवित्र, शुद्ध असा होतो. श्री गुरुंनी येथे जी तपश्चर्या केली त्यामुळे तेथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अंतकरण शुद्ध होते. निर्मळ होते. आजही औदुंबर येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. उपासनेतून माणसाचे मन पवित्र होत जाते. औदुंबर येथे स्वामी फार थोडा काळ राहिले. पण त्यांना तेथे प्रखर एकांत लाभला आणि त्यांनी तिथे तपश्चर्या केली. त्यामुळे येथील वातावरण अतिशय निर्मळ झाले आहे. औदुंबर वृक्षाखाली राहून त्यांनी तपश्चर्या केली म्हणून हे क्षेत्र औदुंबर नावाने प्रसिद्ध झाले. भाविक भक्तांनी इथे साधना केली, अनुष्ठाने केली, गुरुचरित्राचे पारायण केले तर विलक्षण अनुभव येतात. अध्यात्मिक उन्नत्ती, सद्गुरु कृपा आणि साधना मार्गातील प्रगतीसाठी औदुंबर हे तीर्थस्थान अतिशय उत्तम आहे. याच ठिकाणी योगी ब्रह्मानंद स्वामी यांनी संजीवन समाधी घेतली आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी या ठिकाणी अनेकदा भेट दिलेली आहे. अर्वाचीन काळातील सुरुवातीला प्रसिद्धिला आलेल्या आणि मूळ पादूका जिथे आहेत अशा औदुंबर- वाडी- गाणगापूर या तीन दत्त क्षेत्रातील औदुंबर हे प्रथम स्थान आहे. औदुंबर येथे राहण्यासाठी भक्त निवास तसेच भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. इथे राहून अनुष्ठान, जप, पारायणे करता येतात. येथील दत्तकृपेची अनुभूती अजूनही भाविकांना येत असते. येत असते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्रीदत्त संस्थान औदुबर

ता. पलुस जि. सांगली

फोन: (०२३४६) २३००५८ / ९९७०१२९७१३

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon