श्रीक्षेत्र बाळेकुंद्री

          बेळगाव पासून बागलकोट रस्त्यावर १५ कि. मी. अंतरावर बाळेकुंद्री या नावाचे एक गाव आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील ( इ. स. १८५५ ते १९०५ ) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकीक नाव श्री. दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी. शिक्षण मॅट्रिकपर्यंत. व्यवसाय बेळगाव येथील“ लंडन मिशन स्कूलमध्ये शिक्षक ”. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत- पार्श्ववाड, जिल्हा बेळगांव, यांचेकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरुंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला.

           गृहस्थाश्रमाची सर्व जबाबदारी सांभाळून आपल्या पंचप्राण असलेल्या पाच बंधूनाच नव्हे, तर अन्य नातेवाईक व निराधार विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या संस्कारात वाढविले. श्रीपंतांच्या पत्नी सौ. यमुनाक़्का- अन्नपूर्णा ( देवी ) होत्या. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरुंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वांना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.

          निजाम राजवटीत श्रीक्षेत्र गाणगापूर नजिक असलेल्या देऊळगावी श्री. गुराप्पा नावाचे वतनदार देशपांडे  होते. त्यांचे कुलदैवत श्रीअंबाबाई आणि आराध्य दैवत श्रीदत्तात्रेय होते. दत्तसंप्रदायाचा “ श्रीगुरुचरित्र ” हा ग्रंथ त्यांना प्राणप्रिय होता. असा कुलस्वामिनी-कृपापूर्ण व श्रीदत्तभक्तिपरायण कुलात श्रीपंतांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज पराक्रमाने वतनदार होऊन बाळेकुंद्रीला “ कुलकर्णी ” म्हणून आले. म्हणून देऊळगावकर “ बाळेकुंद्रीकर ” झाले. श्रीपंतांचे मातृ घराणे बेळगाव नजिक दड़्डी येथील कुलकर्णी. या घराण्यातही श्रीदत्तभक्ती होतीच म्हणून श्रीपंतांचे ठायी दत्तभक्तीचा “ त्रिवेणी ” संगम झाला होता.

          पार्श्ववाड, जि. बेळगाव येथील श्री. बालमुकुंद कुलकर्णी, वतनदार हे मूळचे वाई येथील जोशी-स्मार्त. त्यांनी बेळगाव तालुक्यातील देसनूर जवळच्या निर्जन अरण्यात खडतर साधना केली. श्रीपंतांना आपले शिष्यत्व देऊन संप्रदाय सुपूर्द केला आणि ते श्रीशैल्य यात्रेला निघून गेले.

          श्रीपंत म्हणतात “ अनुभव प्रथम, नंतर वेदांत शास्त्रे वगैरेंचे अवलोकन ”. अवधूतमार्ग सर्व समावेशक कसा याबाबत श्रीपंत म्हणतात, अवधूतमार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करुन घेणे, तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पाडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरु असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी-अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच. अवधूतमार्ग म्हणजे अद्वैतानुभव. अवधूतांना मूक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी. म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना “ गुरुपुत्र ” म्हणत. असा “ जिव्हाळा-प्रेम ” हा या पंथाचा आत्मा आहे.  हा पंथ शुद्ध प्रेमावर व अंत:करण शुद्धीवर भर देणारा असल्याने “ ओम नम: शिवाय ” चा जप, एकतारीवर भजन एवढीच साधना अवधूत पंथामध्ये आहे. किंबहुना श्रीपंतांनी अध्यात्मातील “ साधना ” या शब्दाचे भयच काढून टाकले.

          “ जसा आहेस तसा मीळ ” (जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा… असा अर्थ ) हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादूकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. “ नितीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल रहा. भिक्षा मागू नये. लोकांना त्रास देऊ नये. सन्यासी बनू नका संसारात राहूनही परमार्थ करा. असा कर्म - मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे.

          श्रीपंतमहाराजांनी विपुल वाड:मय निर्माण केले आहे. श्रीपंतमहाराजांचा जीवनपट म्हणजे इ. स. १८५५ ते १९०५ अवघा ५० वर्षांचा. या अल्प कालावधीत विद्यार्थी दशेत असताना वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांना श्री बालमुकुंदमहाराजांचा अनुग्रह मिळाला. त्यानंतर नोकरी, बंधुंची शिक्षणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत असतानाच त्यांनी गुरुआज्ञेनुसार अवधूत मार्गाचा प्रसार केला. संप्रदायाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवून श्री बालमुकुंद श्रीशैल्य यात्रेस निघून गेल्यानंतर सद्गुरुंचा वियोग हाच श्रीपतांच्या वांड:मयाचा उगम ठरला. या कालावधीत त्यांचे प्रचंड गद्य-पद्य वांड:मय लेख, पदावली, पत्रे या स्वरुपात प्रसृत झाले. त्यापैकी भक्तांनी जतन करुन ठेवलेले वाड:मय आज उपलब्ध आहे.

          १. श्रीदत्तप्रेमलहरी२. श्रींची पत्रे३. भक्तालाप४. स्फुटलेख५. बोधवाणी६. बाळबोधामृतसार७.भक्तोद्गार अथवा प्रेमभेट८. आत्मज्योति-अनुभववल्ली-ब्रह्मोपदेश९. प्रेमतरंगया व्यतिरिक्त “ परमानुभवप्रकाश ”, “श्रीपंत महाराजांचे चरित्र ”, “ श्रीपंत गुरुचरित्र पोथी ”, श्रीपंत बंधू प. पूज्य गोविंददादा यांनी श्रीपंथांच्या सन्निध आलेले उत्कट अनुभव लिहिलेले “ गोविंदाची कहाणी ” इ. बोधपर वाड:मय उपलब्ध आहे.

 

          श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव- ५९११०३

फोन: (०८३१) २४१८२४७ / २४१८४८०/ ३२९५७४४

वेबसाईट: www.panthmaharaj.com

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon