श्री क्षेत्र बसवकल्याण

          बसवकल्याण हे क्षेत्र सोलापूर पासून ११० कि. मी. अंतरावर आणि श्रीक्षेत्र माणिकनगर पासून ३० कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. सोलापूर पासून हैदराबाद मार्गावर सस्तापूर या ठिकाणाहून बसवकल्याणकडे रस्ता जातो. हे एल अत्यंत पुरातन आणि अद्भुत असे श्रीदत्त क्षेत्र आहे. या मंदिराला समाधिमंदिर असेच म्हणावे लागेल. तेथील मठाधीशांनी येथे समाधी घेतली आहे. सध्या तेथे ४८ समाध्या आहेत आणि इतर ठिकाणी असलेल्या ३० अशा ७८ मठाधीशांच्या समाध्या आहेत. एकूण ९ भूयारे आहेत. या संप्रदायाला आनंद संप्रदाय असे म्हणतात. द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पाच पांडव द्रौपदीसह बद्रीनाथकडे निघून गेले. अभिमन्य़ूचा मुलगा परिक्षीत राजाने नंतर राज्यकारभार केला. त्याचा मुलगा जनमेजय याने एक मोठा यज्ञ आणि सत्र केले. त्यानंतर पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञातून एक बालक बाहेर पडले. ते अत्यंत हसतमुख आणि अतिशय आनंदी वृत्तीचे होते. त्यांना सतत आनंदी राहण्याच्या वृत्तीने त्यांचा सदानंद असे म्हणू लागले. श्रीदत्तप्रभूंनीच कलियुगाच्या प्रारंभी श्रीसदानंद या रुपाने जन्म घेतला. या सदानंदांनी बालपणीच अतिशय उग्र तपश्चर्या करुन श्रीशंकराला प्रसन्न करुन घेतले. शंकराने त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा ते सदानंद म्हणाले, “मला तुमच्या चरणी कायम ठेवा.” त्यानंतर शंकरांनी त्याला आज्ञा केली तू पश्चिमेकडे जा. तुझी अवधुतांबरोबर भेट होईल. तेच तुझे गुरु आणि मार्गदर्शक होतील. तेव्हा सदानंदाने विचारले की मी त्यांना कसे ओळखू शकेन? तेव्हा श्री शंकरांनी सागितले की तू प्रत्येक हजार पावले टाकल्यावर “अहो श्रीदत्ता” अशी गर्जना कर. ज्या ठिकाणी तुला प्रतिसाद मिळेल त्या ठिकाणी तू तपश्चर्येला बस. तिथेच तुला अवधुतांचे दर्शन होईल. शंकराच्या आज्ञेप्रमाणे श्री सदानंदांनी पश्चिमेकडे प्रयाण केले. मजल दरमजल करीत ते चालू लागले. प्रत्येक हजार पावलांवर ते दत्तात्रेयांचा गजर करीत होते. असे फिरत फिरत ते कल्याण नगरीत आले. तिलाच आता बसवकल्याण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी त्यांनी श्री दतात्रेयांचा पुकारा केल्यावर त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांनी ओळखले की इथेच आपली अवधूतांची भेट होणार. त्यांनी तिथे तपश्चर्या सुरु केली. तिथेच त्यांना श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी सदानंदांवर पूर्ण कृपा केली. सदानंद मात्र त्याच ठिकाणी एका गुहेमध्ये तपश्चर्या परीत राहिले. त्यांनी कल्याण येथे आनंद संप्रदायाची स्थापना केली. ही सर्वांत प्राचीन दत्त परंपरा असून तिचा उगम कलियुगाच्या प्रारंभी म्हणजे साधारण ५००० वर्षांपूर्वी झालेला आहे असे दिसून येते. श्री सदानंदांचे शिष्य श्री रामानंद यांनी हा संप्रदाय पुढे वाढवला आहे. ती परंपरा अजूनही सुरु आहे. या संप्रदायाची गुरु परंपरा विष्णु विधी अत्री दत्त सदानंद रामानंद अशा प्रकारे पुढे सांगतात.

          श्री बसवकल्याण हे एक विलक्षण दत्तक्षेत्र असून तेथे अनेक भूयारे आहेत. एखाद्या गढी सारखे हे मंदिर असून प्रत्येक भूयारामध्ये अनेक मठाधीशांच्या समाध्या आहेत. या भूयारांमध्ये आत उतरुन गेल्यावर त्या समाध्या पाहून अक्षरश: थक़्क व्हायला होते. अतिशय आनंद होतो आणि विलक्षण अनुभूती येतात. सदानंद मठ परिसरामध्ये शेकडो वर्षांपूर्वीचे एक मोठे वडाचे झाड असून त्या परिसरामध्ये सर्वत्र श्रीदत्त स्पंदने जाणवतात. या क्षेत्राचे विशेष म्हणजे येथे सदानंद महाराजांची संजीवन समाधी आहे. तसेच येथे श्रीदत्त पीठ आणि श्री सरस्वती पीठ आहे. अतिशय जागृत असे हे सरस्वती पीठ असून सरस्वती माता पूर्वी बोलत असे. शंकराचार्य जेव्हा येथे आले आणि त्यांनी तिचे दर्शन घेतले तेव्हा तिने त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्यानंतर तिचे बोलणे थांबले आणि श्री शंकराचार्यांनी प्रचंड लिखाण केले, अशी अख्यायिका आहे. याठिकाणी श्रीगणपतीची एक ‘सुमुख गणेश मुर्ती’ आहे. श्री गणेशाच्या जन्म कथेनुसार शंकराकडून त्याचा शिरच्छेद झाला आणि तेथे नंतर हत्तीचे मुख लावण्यात आले. शिरच्छेदापूर्वीची श्रीगणेशाची विलक्षण सुंदर मुर्ती येथे आहे. श्रीदत्तात्रेयांचे पीठ ही जागृत असून तेथे श्री दत्तपादुका आहेत. मुख्य मंदिरामागे औदुंबराचा वृक्ष असून भूयारामध्ये अत्यंत विलक्षण अशा ‘श्रीशेषदत्त पादुका’ आहेत. शेषनागाच्या उदरामध्ये पादुका असे कदाचित हे एकमेव क्षेत्र आहे. या पादुका उत्तम अवस्थेमध्ये असून त्यांच्या दर्शनाने मन तृप्त होते. तेथेच एक घृतविहीर म्हणजे तुपाची विहीर होती. यज्ञप्रसंगी त्या विहीरीतून तूप काढून वाढले जात असे अशी अख्यायिका आहे. या क्षेत्रातील मठाधीश पूर्णत: प्रसिद्धी परांड्मुख असून या क्षेत्राची फारसी माहिती दत्तभक्तांना नाही. प्रत्येक दत्तभक्ताने येथे जाऊन दर्शन घेतले पाहिजे आणि एक दैवी दत्त अनुभूती घेतली पाहिजे. येथील मठाधीशांच्या समाधींची संख्या ७५ हून अधिक आहे. किमान ८० वर्षे प्रत्येकाचे आयुष्य गृहीत धरले तरीही हा मठ आणि ही दत्त परंपरा किमान ५००० वर्षांपूर्वीची आहे. असे अनुमान काढता येते. खरतर येथे अभ्यास आणि संशोधन करणे गरजेचे आहे.

          या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि दोन्ही वेळी भोजनप्रसादाची व्यवस्था आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्री सदानंद दत्त महाराज मठ,श्री क्षेत्र बसवकल्याण, जि. बिदर. कर्नाटक

फोन क्र. : (०८४८१) २५०२५३ / ०९४४८२२२८५३ / ०९४८३५००२५६

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon