श्रीक्षेत्र भालोद

          श्रीक्षेत्र भालोद हे ठिकाण पुण्यापासून ६६० कि.मी. अंतरावर, मुंबईपासून – ४०० कि.मी.,  नाशिक – ३०० कि.मी., गरुडेश्वर – ५५ कि.मी., नारेश्वर – ७५ कि.मी. अशा अंतरावर आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये श्रीदत्तप्रभूंची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. जबलपूर, होशंगाबाद, गरुडेश्वर, राजघाट ( चिखलदाच्या समोर) आणि भालोद.  यातील दक्षिण किनाऱ्यावर राजघाट आणि भालोद हिच दोन दत्तमंदिरे आहेत. प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष हाताने प्रस्थापित झालेले राजघाटचे दत्त मंदिर आहे. यानंतर जर दुसरं म्हणाल तर ते भालोदचे एकमुखी दत्त मंदिर हे आहे. राजघाट येथिल श्रीदत्तमंदिर हे सुद्धा एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.

         स्वामी महाराजांच्या चातुर्मास चिखलदा (म.प्र.) येथे असताना भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचे कार्य झाले आहे. योगा योगाचं असेल कदाचित ! महाराजांच्या स्वप्न दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद येथे राहण्यासाठीचा आदेश मिळाला. याच दरम्यान बडोदा येथे काशिताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमुर्ती भालोद येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले. काशिताई निरखे यांच्या आजोबांना रात्री दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे, मला तू घेऊन जा, असे स्वप्नामध्ये सांगितले. त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती शोधत आली आणि बडोदा येथे त्यांचे मंदिर देखिल बनले. आजोबांनंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे ( काशीकडे ) मंदिराचा कारभार आला. त्यांनी ८५ पर्यंत वयाची मजल गाठली. पुढे कार्य होत नव्हते, काय करावे ते कळत नव्हते. पण शेवटी भक्तांची काळजी देवालाच असते ना ! त्यांना रात्री स्वप्न पडले आणि श्रीदत्तप्रभूंनी आदेश दिला कि उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला तू मला देऊन टाक. अगदी तसेच घडले. पू. प्रतापे महाराज मंदिरात पोहोचले आणि दत्तप्रभू भालोदला आले. नर्मदा किनाऱ्यावरील भालोद येथिल ही मूर्ती एकमुखी आणि शाळीग्रामाची आहे. वक्षस्थळावर गोमुख स्पष्टपणे दिसते ! निरखून बघितल्यावर योगाचे षट्चक्षु पण लक्षात येतात !

           मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे, आश्रमा समोर नर्मदचे विशाल पात्र, सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा सदैव आश्रमातला वावर, मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही ! भालोद या ठिकाणी कन्यापूजन हा विधी केला जातो. तसेच नर्मदामातेची ओटी भरली जाते. येथे हमखास नर्मदा परिक्रमार्थी भेटतात. त्यांचेसाठी सदावर्त आणि राहण्याची व्यसस्था येथे आहे. याठिकाणी श्रीसत्यदत्तपूजा आणि दत्तयाग हे विधी करता येतात. श्रीगुरूचरित्राच्या पारायणासाठी राहता येते. येथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून होडीने श्रीक्षेत्र नारेश्वराला जाता येते. साधारण एक तासाचा प्रवास आहे. नर्मदेच्या विशाल पात्राचे दर्शन आणि दोन्ही तीरावरील मंदिरे पहात जाण्याचा हा अनुभव विलक्षण आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्रीदत्त मंदिर देवस्थान, मु. पो. भालोद, ता. जगडीया जि. भरूच, गुजरात – ३९३१०५,                  

दूरध्वनी : (०२६४०) २४३६०३ / ०९०९९९६८३०९ / ०९८१९९१२३८०

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon