श्रीक्षेत्र गाणगापूर

          श्रीदत्त संप्रदायातील सर्वात महत्वाचे आणि सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र गाणगापूर हे आहे. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी २४ वर्षे म्हणजे दोन तपाहून अधिक काळ वास्तव केले. येथूनच मग ते अवतार समाप्तीसाठी श्रीशैल्यकडे गेले. श्रीगुरूंच्या अवतार कार्यातील अत्यंत वैभवाचा काळ गाणगापूर येथे गेला. त्यांनी येथे असंख्य लीला घडवल्या. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी रोकडी प्रचिती आणून दिली. या सर्वांमुळे श्रीक्षेत्र गाणगापूर हे भूतलावरील अत्यंत प्रख्यात असे तीर्थक्षेत्र बनले आहे. नृसिंहवाडी येथे श्रीगुरुंच्या लीला सर्वत्र पसरल्या. त्यांना भेटायला झुंडींने लोक येवू लाघले. तेव्हा तिथे मनोहर पादूका स्थापन करून त्यांनी पुढे प्रयाण केले. फिरत फिरत ते भीमा अमरजा संगमावर आले. त्याकाळी या नगराला गंधर्वनगरी या नावाने ओळखत होते. भीमा अमरजा संगम परिसरामध्ये त्यावेळी जंगल होते. अतिशय शांत आणि एकांत असा तो परिसर होता. श्रीगुरूंनी तेथे प्रदीर्घ अनुष्ठान केले. संगमावर त्यांनी असंख्य भक्तांना दर्शन दिले. गाणगापूर येथील भक्तांना अत्यंत प्रिय स्थान म्हणजे श्रीगुरूंचा मठ अथवा निर्गुण पादुका मंदिर हे होय. या मठाचे स्वरूप मंदिरासारखे नसून मोठ्या धाब्याच्या घरासारखे आहे. पूर्वेस व पश्चिमेस मठास महाद्वारे आहेत. पश्चिमद्वारावर नगारखाना आहे. मठाच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औंदुबर, त्याखाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे. या वृक्षाच्या भोवती नागनाथ, मारूती व तूळशीवृंदावन आहे. मठाभोवतीच्या ओवऱ्यांत सेवेकरी व साधक अनुष्ठानास बसतात. मठाच्या दक्षिणभागात उत्तराभिमुख असा श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून त्याच्या समोर उत्तम फरशी केलेला सभामंडप आहे. गाभाऱ्याच्या उजव्या हाताला दरवाजा आहे. येथून आत गेल्यावर गाभारा पश्चिमाभिमुख असल्याचे ध्यानात येते. तेथून एका कोनाड्यात चिंतामणीची वालुकामय मूर्ती स्वत: नृसिंहसरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशाच्या बाजूस पश्चिमाभिमूख अशा दारातून ओणवे होवून प्रवेश करता येतो. लहानशा झरोक्यातून डोकावल्यावर पश्चिमाभिमुख अवस्थेत आसनस्थ अशा त्रिमूर्तीचे मनोहर दर्शन घडते. या आसनावरच श्रीगुरूंच्या पादुका ठेवलेल्या असून त्यांना “निर्गुण पादुका” असे म्हणतात. या पादुका शिळेवर कोरलेल्या नसून सुट्या आहेत. या निर्गुण पादुका चांदीच्या पत्राने मढविलेल्या असून पेटीत बंद करून ठेवलेल्या असतात. कोणासही त्यांना स्पर्श करता येत नाही. श्रीगुरूंच्या पूजेतील बाण, दहा शाळीग्राम, तीन स्फटीकांचे लिंग यांचाही निवास येथे आहे. निर्गुण पादुकांत दत्तात्रेयांचे वास्तव्य असते. अनेकांना यासंबंधीचा साक्षात्कार झालेला आहे. श्रीगुरु देहातीत, गुणरुपातीत होऊन निर्गुणस्वरुप बनले म्हणून या पादुकांना ‘ निर्गुण पादुका ’ असे नाव मिळालेले आहे. गाणगापूरच्या नैऋत्य दिशेला २ कि.मी. वर भीमा व अमरजा यांचे संगमस्थान आहे. भागीरथीकुंडापासून दोन फर्लांगावर श्रीगुरुंचे विश्रांतीस्थान आहे. भक्त पर्वतेश्वर याच्या शेतात हे स्थान असून या शेतकऱ्याची कथा गुरूचरित्राच्या ४७ व्या अध्यायात आलेली आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. श्रीगुरूंच्या अनुष्ठान स्थानाच्या पूर्वेस उत्तरवाहिनी भीमा व दक्षिणेस पूर्ववाहिनी अमरजा या दोन नद्यांचा संगम आग्नेय दिशेस झाला आहे. पश्चिमेस अनादी संगमेश्वराचे देवालय आहे. श्रीगुरूंच्या अनुष्ठान स्थानावर एक मंदिर असून तेथील अश्वत्थ वृक्षाखाली पादुकांची स्थापना केली आहे. भीमातीरावर नरहरी ब्राह्मणास कुष्ठरोग परिहारासाठी औदुंबराचे एक काष्ठ पल्लवित होईपर्यंत सेवा करण्याची आज्ञा श्रीगुरुंनी त्याला केली होती. तो औदुंबर वृक्ष आज तेथे नसला तरी तेथील पादुका अश्वत्थ वृक्षाखाली स्थापन झाल्या आहेत. याशिवाय तेथे अष्टतीर्थे आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे १. षट्कुलतीर्थ२. नरसिंहतीर्थ३. भागीरथीतीर्थ४. पापविनाशी तीर्थ५. कोटितीर्थ६. रुद्र्पादतीर्थ७. चक्रतीर्थ८. मन्मथतीर्थ.

          श्रीगुरुचरित्रामध्ये वर्णन केलेल्या अनेक लीला या ठिकाणी घडलेल्या आहेत. येथील निर्गुण पादुकांचेही महात्म्य विलक्षण आहे. जणू भक्तांना सगुण उपासनेकडून निर्गुण उपासनेकडे घेऊन जाणाऱ्या या पादुका आहेत. निर्गुण याचा एक अर्थ गुणातील म्हणजे सत्व, रज, तम यापलिकडील असा आहे. निर्गुण पादुकांच्या दर्शनाने अष्ट सात्विक भाव जागृत होतात. अत्यंत वेगळे असे समाधान मिळते. गाणगापूर येथे आल्यावर दैवी अनुभूती येतात. हे सगळेच वातावरण मंत्रभारित असल्यासारखे वाटते.

          गाणगापूर येथे श्रीगुरूंचे नित्य वास्तव्य असते. याबाबत गुरुचरित्रातील खालील ओव्या पाहण्यासारखे आहेत.

 

आम्ही असतो याचि ग्रामी l नित्यस्नान अमरजा संगमी l

वसो माध्यान्ही मठधामी l गुप्तरुप अवधारा l l

अ. ५१ ओवी १४

स्थान आमुचे गाणगापुरीl येथिनि न वचे निर्धारी l

लौकिकमते अवधारी l बोल करितो श्रीशैल्य यात्रा l l

अ. ५० ओवी २५७

आम्हास आज्ञापिती मुनी l आम्ही जातो कर्दळीवनी l

सदा वसो गाणगाभुवनी l ऎसे सांगा म्हणितले l l

अ. ५१ ओवी ४८

          असे गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य आहे. सोलापूरहून गाणगापूरला जाता येते. गुलबर्गा स्टेशन पासून २७ कि.मी. अंतरावर गाणगापूर आहे. महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून गाणगापूरला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. गाणगापूर रोड या रेल्वे स्टेशनला उतरुनही गाणगापूरला जाता येते. गाणगापूरला श्रीदत्तात्रेयांचा राजदरबार असे म्हटले जाते. सर्व प्रकारच्या समस्या, व्याधी, अडचणी यातून येथे मुक्तता होते. या दत्त दरबारामध्ये सेवा केल्याने भूत-पिशाच्च्य बाधाही नाहिशी होते, असा अनुभव आहे. महाव्याधिने पिडलेले व कुष्टीही येथे रोग निवृत्ती करिता येतात. याशीवाय निरनिराळ्या कामाकरिता किंवा ईश्वरी प्रसादाकरिता येथे आर्त भक्त येतात व अनुष्ठाने करतात. असा अनुष्ठान करणारा सेवेकरी श्रीमंत असो किंवा गरीब असो,, त्याने रोज संगम स्नान, गुरुपादुकांचे दर्शन श्रींचे ध्यान, गुरुचरित्रांचे पाठ, प्रदक्षिणा वगैरे अनुष्ठान व भिक्षेचा प्रसाद याप्रमाणे श्रींचा अनुग्रह होईपर्यंत करावे लागते. गाणगापूरामध्ये रोज दुपारी माधुकरी मागण्याची परंपरा आहे. किमान ५ घरांमध्ये माधुकरी मागावी, असा नियम आहे. प्रत्यक्ष दत्तप्रभू आपल्याला कोणत्या ना कोणत्या रुपात माधुकरी देतात अशी श्रद्धा आहे. तसेच आपणही माधुकरी देवू शकतो.

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon