श्रीक्षेत्र गरूडेश्वर

          प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गरुडेश्वर याठिकाणी समाधी घेतली आहे. नर्मदेच्या तीरावर हे ठिकाण असून त्याचे महात्म्य अपार आहे. गुजरात राज्यात नर्मदा या जिल्ह्यामध्ये राजपिपला पासून १५ कि.मी. आणि बडोद्यापासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे स्थान पूरातन असून येथे महादेवाचे मुख्य मंदिर आहे. गरुडाने श्रीविष्णूंच्या आज्ञेवरून गजासूर नावाच्या एका राक्षसाचा वध या ठिकाणी केला म्हणून या क्षेत्राचे नाव गरुडेश्वर असे पडले आहे. हा सर्व परिसर आदिवासी लोकांचा होता. गावाबाहेर नर्मदा किनारी महादेवाचे मंदिर प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शोधून काढले. त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. त्यांचा अखेरीचा काळ त्यांनी येथे घालवला आणि शेवटी जून १९१४ रोजी येथे समाधी घेतली. माणगाव, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे जन्म घेतलेल्या स्वामी महाराजांनी संपूर्ण भारत पालथा घातला. त्यांनी एकूण २३ ठिकाणी चातुर्मास केले. आपल्या जिवित काळात त्यांनी विपूल लेखन केले. ५००० हून अधिक पृष्ठांचे लेखन त्यांनी कोणतीही साधने नसताना केले. शंकराचार्यानंतर एवढी साहित्य निर्मिती करणारे थोरले स्वामी हे एकमेव संत आहेत. साक्षात दत्तप्रभू त्यांचे बरोबर रोज संवाद साधत असत. त्यांच्या जीवनात त्यांनी अपार कष्ट सोसले. फार मोठा शिष्य परिवार त्यांचेभोवती जमला होता. त्यातील काही दंडशिष्य होते, तर इतर काही एकनिष्ठ असे शिष्य होते. दंडी-शिष्यामध्ये – प. प . श्री. प्रज्ञानंदसरस्वती (मोघे) स्वामी (दुर्गाघाट – श्रीक्षेत्र काशी), श्री प. प . पूर्णानंदसरस्वती (पेंडसे) स्वामी (आयनी मेटे, खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा), श्री प. प. नारायणस्वानंद सरस्वती स्वामी (नायकोटवाडी) असे काही दंडीस्वामी होते. यामध्ये सर्वात श्रेष्ठ दंडी स्वामी म्हणून प. प. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी (श्री. दिक्षित स्वामी) हे अग्रक्रमाने पहिले दंडीस्वामी म्हणून ओळखले जातात. खुद्द प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामीजी म्हणत – “हे स्वामी (दिक्षित स्वामी) आमच्यापेक्षा कांकणभर सरस आहेत.” प. प. दीक्षितस्वामींनी शके १८४५ ज्येष्ठ (इ.स. १९२३) मध्ये श्रीक्षेत्र औरवाड येथे ‘श्री. वासुदेवानंद सरस्वती पीठ’ स्थापन केले. प. प. श्री. स्वामीजींचे इतर शिष्यांमध्ये  श्री. योगानंद सरस्वती तथा गांडा महाराज (१८६८-१९२८), श्री. रंगावधूत महाराज (१८९८-१९६८), श्री. वा. द. गुळवणी महाराज (१८८६-१९७४), श्री. नाना महाराज तराणेकर (१८९६-१९९३) या सर्वांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याव्यतिरिक्त अनेक शिष्यगण होते. या पांच (दंडीस्वामी महाराझ आणि इतर चार महाराज) शिष्य आणि खुद्द प. प. स्वामीजींचे असे आंतरिक, आध्यात्मिक नाते होते.

          प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामीजी आपल्या २३ व्या चातुर्मासासाठी चैत्र वैद्य ६. शके १८३५ (इ.स.१९१३), रोजी श्रीगरुडेश्वर येथे आले. श्रीगरुडेश्वराजवळच श्री नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या दोन्ही तीरांवर सगळीकडे, बहुधा श्री. शंकराचीच लहान-मोठी देऊळे आहेत. ज्यावेळी श्री. स्वामीजी येथे वास्तव्यास आले, त्यावेळी मोजकी-छोटीशी ५-६ झोपडीवजा राहण्याची घरे होती. येथील नर्मदा (नर्म-सुख, समाधान, दा-देणारी) पश्चिमवाहिनी आहे. तिच्या पाण्याच्या प्रवाहाला जरा जास्तच धार (ओढ) आहे. या नदीच्या जवळच श्री. शुलपाणीश्वराचे जंगल – घनदाट जंगल आहे. ते आता वनसमृध्दीच्या दृष्टीकोनातून खूपच प्रसिद्धीस आले आहे. १९३५ च्या सुमारास ज्यावेळी श्री. स्वामीजी येथे आले त्यावेळी ते येथे १४ महिने राहिले. तेव्हा ‘गरुडेश्वर’ हा तसा निर्जन, ओसाड भाग होता. तरी श्री. स्वामीजींचे येथे आगमन झाले आणि थोडयाच कालावधीमध्ये या गावाला एक आगळे-वेगळे स्वरुप – ‘तीर्थक्षेत्राचे स्थान’ प्राप्त झाले. परिणामी श्री स्वामीजींच्या पावन दर्शनासाठी माणसांची प्रचंड गर्दी होत होती.

          श्री. स्वामीजी श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे आले, त्यावेळी त्यांच्या बरोबर काही शिष्य-मंडळी होती. त्यामध्ये श्रीरामशास्त्री प्रकाशकर, श्री. योगानंदसरस्वती स्वामी, श्री. धोंडोपंत कोपरकर वगैरे, प्रामुख्याने श्री. स्वामीजींच्या सेवेसाठी तत्पर होती. एके दिवशी श्री. स्वामीजी रामशास्त्रींना म्हणाले, ‘यापुढे …..’ आणि श्री. स्वामीजी एकदम थांबले, पण थोड्याच वेळात मंद गतीने म्हणाले, ‘यापुढे आम्हांस येथून दुसरीकडे, कोठेही जावयाचे नाही. अशीच श्रींची इच्छा आहे.’ एवढे बोलून श्री. स्वामीजी डोळे मिटून शांत राहिले. त्यानंतर भक्तगणांनी श्री. स्वामींनी विनंती केली, “प्रभो, आपली प्रकृती क्षीण होत आहे. आपण विश्रांती घ्यावी. फार बोलू नये. आपणांस नको असले तरी आम्हा सर्वांच्या आग्रहाखातर आपण औषध घ्यावे ही नम्र प्रार्थना आहे.” हे शब्द ऎकताच, मंद – क्षीण आवाजात श्री. स्वामीजी म्हणाले, “ आता आम्हाला हा देह लवकरच सोडून जावयाचे आहे, तेव्हा मला कोणत्याही औषधाची गरज नाही,” हे शब्द ऎकताच तेथील सर्व भक्तमंडळीच्या ह्र्दयांत कालवाकालव झाली. श्री. स्वामीजी पुन्हा मंद गतीने म्हणाले, “श्रीमत आद्यशंकराचार्य हे ३२ वर्षेच राहिले. त्या मानाने हा आमचा देह ६० वर्षे, बराच काळ टिकलेला आहे. या देहाला दोन वेळा सर्पदंश, तीन वेळा महामारी, एक वेळ सन्निपात, एक वेळ प्लेग, दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड …. इतके रोग उत्पन्न झाले.” मग थोडा वेळ थांबून पून्हा म्हणाले, “संग्रहणी तर कायमचीच आहे. यावेळी कोणी औषध दिले ? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे, तो वैद्य (श्रीदत्तप्रभू) या वेळेही आहेच ना ? जशी त्याची इच्छा असेल, तसेच होईल !” त्यानंतर लगेचच आषाढ प्रतिपदेच्या दिवशी स्वामी महाराजांनी अवतार समाप्ती केली. 

          गरुडेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचे सुंदर मंदिर असून तेथेच खालच्या बाजूला थोरल्या महाराजांचे समाधी मंदिर आहे. परिसरात महादेवाचे मंदिर असून छोटी मोठी इतर मंदिरे आहेत. खाली नर्मदेचा घाट असून अतिशय रमणीय असा किनारा आहे. येथे श्रीगरुडेश्वर दत्त संस्थान असा ट्रस्ट कार्य सांभाळतो. याठिकाणी भक्तनिवास आणि भोजन प्रसाद व्यवस्था उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

श्रीगरुडेश्वर दत्त संस्थान, व्हाया राजपिपला, गरुडेश्वर, जि. नर्मदा – ३९३१५१

फोन : (०२६४०) २३७००५,  मोबाईल : ०९४०९४७९८५८ / ०९४०९४५६४४३ 

संस्थेची माहिती वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. www.shreegarudeshwardattsansthan.org

 

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon