श्री क्षेत्र कडगंची

       श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे ४ पट्टशिष्य होते. ते सतत त्यांच्याबरोबर होते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी ४ शेवंतीची फूले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्री नंदिनामा, श्रीनरहरी आणि श्री सिद्धमुनी हे होते. स्वामी महाराजांसमवेत प्रदीर्घ काळ व्यतीत केल्यामुळे त्यांना स्वामींच्या लीला आणि कार्याची माहिती होती. यातील श्री सायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहीला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या प्रास्ताविक, अनुभूती देणाऱ्या आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या ग्रंथाचे लिखाण या ठिकाणी झाले. त्यामुळे यांचे स्थानमहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती आणि तिचे रक्षण दोन नागसर्प करीत असत असे सांगितले जाते. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरुपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत. प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. म्हणजेच या ग्रंथामुळे लाखो लोकांची जीवने बदलली आहेत. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. त्यांचे ऐहिक आणि अध्यात्मिक जीवन बदलून गेले आहे. अशा या साक्षात्कारी ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरुंच्या चिरंतन अस्तित्त्वाची पूण्यभूमी असेही म्हणता येईल. या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांच्या करुणा पादूका आहेत. त्या भक्तांवर कृपा करतात. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.

          गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रुपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरुंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यासमोर ठेऊन श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादूका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्यांच्या वंशजांनीही या पादूकांचे नित्यनियमाने पूजन सुरु ठेवले आहे. त्याच या करुणा पादूका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या गुहेचा शोध घेताना खोदकाम चालू होते. तेव्हा त्याठिकाणी ८ ते १० फूटांपर्यंत खोदल्यावर तेथे दिव्य सुगंध येऊ लागला आणि तेथून भस्म निघू लागले. ही एक अपूर्व अनुभूती आहे. आपण त्या गुहेत जाऊन दर्शन घेऊ शकतो. सध्या या ठिकाणाजळ भक्त निवास आणि गोशाळा आहे. तसेच तेथे भोजन आणि प्रसाद व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. तिथे जाऊन आपण गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी राहू शकतो.  

          श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान या नावाचा ट्रस्ट तिथे स्थापन करण्यात आला असून श्रीशिवशरणाप्पा स्वामी हे तिथे कार्य सांभाळत आहेत. त्यांनी यासाठी अपार कष्ट उपसले आहेत. त्यांचे वडीलोपार्जीत घर याच मंदिराच्या शेजारी होते. त्यांच्या घराण्यात श्रीदत्तभक्तीची परंपरा अव्याहतपणे सुरु होती. एकदा त्यांना सायंदेव यांच्या पडक्या घरामध्ये एक सत्पुरुष बसलेले आढळले. ते मंदिराकडे एकटक पहात भान हरपून बसले होते. जणू ते समाधी अवस्थेमध्ये गेले होते. आसपासचे गावकरी गोळा झाले. सर्वजण घाबरून गेले. काही वेळाने ते भानावर आले आणि म्हणाले, “ मला येथे एका तांब्याच्या पेटीमध्ये लाल फडक्यात बांधून ठेवलेली श्रीगुरुचरित्राची पोथी दिसत आहे आणि त्यावर शेवंतीचे फूल ठेवले आहे. ” ते ऐकून श्रीशरणाप्पा यांनी यापुढचे सर्व जीवन श्रीदत्तात्रेयांच्या सेवेत घालवण्याचा निश्चय केला. स्थानिक गावकरी आणि सर्वांच्या सहकार्याने ट्रस्ट स्थापन केला आणि या क्षेत्राचा प्रसार प्रसार व्हावा आणि तिथे मूलभूत सोयी व्हाव्यात म्हणून झपाट्याने कार्याला सुरुवात केली. ते कानडी मिश्रित हिंदी भाषेत बोलतात. श्रीदत्तगुरुंच्या आशिर्वादाची प्रचिती श्रीक्षेत्र कडगंची येथे येते. प्रत्येक श्रीदत्तभक्ताने एकदा तरी येथे भेट दिली पाहिजे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी श्री. शिवशरणाप्पा यांचेशी संपर्क साधावा.

श्री. शिवशरणाप्पा श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान श्रीक्षेत्र कडगंची

ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक. पिन: ५८५३११

फोन क्र. (०८४७७) २२६१०३ / ०९७४०६२५६७९ / ०९९०११७८५९३

तसेच www.shrisayandevdattakadganchi.org या वेबसाईटला भेट द्यावी.

                   

श्रीगुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताने शक्य असेल तेवढी किमान काही रक़्कम या क्षेत्रासाठी मदत म्हणून पाठवावी, असे वाटते.

ज्यांना येथे काही मदत / देणगी द्यायची आहे त्यांनी खालील बॅक खात्यावर रक़्कम पाठवावी.

खात्याचे नाव : श्रीदत्तात्रेय देवस्थान कडगंची

बॅंकेचे नाव : स्टेट बॅंक ऑफ इंडिया

शाखा : कडगंची       शाखा क्र. ३८२५

खाते क्र. १०८१४१८५३५७

IFSC कोड : SBIN0003825

          रक़्कम पाठवल्यावर श्री. शिवशरणाप्पा यांना फोन करुन त्याप्रमाणे कळवावे.

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon