श्रीक्षेत्र कारंजा

          श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे. याचा शोध प.प.वासुदेवनंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून सुमारे २५ कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. या ठिकाणी १९३४ साली प.प. ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्रीगुरुमंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्माबद्दलची कथा अशी आहे, श्रीपाद श्रीवल्लभ अवतार काळामध्ये कुरवपूर येथेएकदा एक विधवा स्त्री आपल्या जडमूढ अशा पुत्रासह कृष्णा नदीत जीव देण्यास निघाली असता तिने नदीतीरावर असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांना पाहून वंदन केले व जन्मोजन्मी असा मूढ पुत्र नसावा व आपल्यासारखी ज्ञानी व जगंदवं असा पुत्र पुढच्या जन्मी मला प्राप्त व्हावा अशी भक्तियुक्त अंत:करणाने त्यांची प्रार्थना केली. “तू शनिप्रदोषाचे दिवशी शंकराची पूजा करावी म्हणजे तुला माझ्यासारखा पुत्र होईल” असे सांगून व तिच्या मूढ पुत्रास ज्ञानसंपन्न करून महाराज गुप्त झाले.

          यानंतर ज्या ब्राह्मण स्त्रीला शनिप्रदोषव्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर वऱ्हाडात करंजा नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अंबाभवानी ठेवण्यात आले. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्यवेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्या वेळीही शनिप्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या सोळ्याव्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच आपले “ श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी ” होत. जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मूखातून ‘ॐ’ काराचा उच्चार बाहेर पडू लागला. अशाप्रकारे श्रीदत्तात्रेयांच्या द्वितिय अवताराने जन्म घेतला.

           कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या ह्या करंजक्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मिळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणूकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंजक्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-माहात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना ह्या बिंदुमती कुंडात आहेत. ( बेंबळपार ह्या नाव्याने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे. ) गंगा व यमुना ह्या कुंडात गुप्त होवून बिंदूमती ( बेंबळानदी ) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-माहात्म्य सांगून रेणूका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्याने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या.

           करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज ‘आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून ह्या करंजक्षेत्राला ‘ शेषांकितक्षेत्र ’ असे ही नाव पडले आहे.

         कारंजा येथील गुरुमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर ८ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेवून डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघड्या डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघड्या ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवण्यात येवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. याठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. तसेच संस्थेच्या वेबसाईटवर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महराज संस्थान, कारंजा जि. वाशीम – ४४४१०५

फोन : (०७२५६) २२२४५५ / २२४७५५ / २२४५०१ / २२३३५५  www.gurumandir.org

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon