श्री क्षेत्र कुडुत्री

          योगिराज वामनरावजी दत्तात्रेय गुळवणी महाराज हे महान दत्तभक्त व शक्तिपातयोगाचे परमाचार्य म्हणून जगद्विख्यात आहेत. हे कोल्हापूर इलाख्यातील, राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाड या डोंगरकुशीतील, तारळे गावचे. त्यांचे वडील दत्तंभट शेतीवाडी व चरितार्थासाठी कुडुत्रीस वास्तव्यास आले. राधानगरीच्या वाटेवर, घाटमाथ्यावर गैबी (गहिनीनाथाचे) स्थान आहे, या डोंगरकुशीत भोगावती नदीच्या निसर्गसमृद्ध तीरावर, अतिशय रम्य असे कुडुत्री हे गाव आहे. कोल्हापूर पासुन फोंडा रस्त्यावर राधानगरीजवळ कुडुत्री आहे.

दर पौर्णिमेला दत्तंभट सौ. उमाबाईंसह नृसिंहवाडीस जात. अत्यंतिक धर्मनिष्ठा व पराकोटीची दत्तभक्ती हे या दांपत्याचे वैशिष्ट्य होते. पुराणातील वर्णनानुसार आपणासही दत्तकृपेचा लाभ व्हावा म्हणून, उमाबाईंनी देवासमोर सात दिवस उपवास केले. गलितगात्र अवस्थेत असताना, सातव्या दिवशी साक्षात दत्तगुरुंनी त्यांना चांदीच्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या. या प्रसादपादुका सध्या ‘ श्रीवासुदेवनिवास ’ पुणे, येथे नित्यपूजेत आहेत. त्यांनाच प्रसाद पादूका म्हणून ओळखले जाते.

          मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चित्रकलेचा अभ्यास केला. चित्रकलेतील टिचर्स ग्रेड ही परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. १९०७ साली गुरुद्वादशीस नरसोबावडीहून ज्येष्ठबंधू शंकरभटजींनी निरोप पाठवला की, “ ध्यानानुसार दत्ताचे चित्र काढून, त्यांस श्लोकबंधाचा हार घातलेले चित्र काढून घेऊन यावे, ” त्यानुसार वामनराव अत्यंत उत्कट भक्तीने एक चित्र तयार करुन, वाडीस घेऊन गेले, तेथे ब्रह्मानंदस्वामींच्या मठात त्यांना श्रीटेंबेस्वामींचे प्रथमच दर्शन घडले. सोबत आणलेले चित्र पाहून स्वामींना अत्यंत संतोष झाला. स्वामींनी एक यंत्र तयार करुन वामनरावांच्या हातात बांधावयास दिले. वामनरावांच्या चित्रकलेला प्रासादिकतेचा परिसस्पर्श लाभला. त्यांची सेवा गुरुंस परमानंद देणारी झाली. ते गुरुकृपांकित झाले.

          यानंतर इ. १९०९ साली पवनीच्या चातुर्मासात श्रीटेंबेस्वामींनी गुळवणीमहाराजांना मंत्रदीक्षा दिली. गुळवणीमहाराज स्वामींचे अनुग्रहीत शिष्य झाले. त्यांनी स्वामींच्या उपदेशानुसार अनुष्ठाने व दत्तोपासना सुरु केली. त्यानंतर हावनूर मध्ये जाऊन त्यांनी सद्गुरु प. प. टेंबेस्वामींची भेट घेतली. हावनूर येथील स्वामींच्या चातुर्मासातील काळामध्ये गुळवणी महाराज स्वामींबरोबर राहिले. तेथे त्यांनी मनापासून सद्गुरुंची सर्वप्रकारची सेवा केली.

          इथे श्रीदत्तयंत्रातील मंत्राची दीक्षा, गीता व विष्णूसहस्त्रनामाची संथा स्वत: स्वामी महाराजांनी त्यांना दिली, व बंधनमुक्त होण्यासाठी संप्रदायाची उपासना सांगितली ती अशी,

             

स्वशाखोपनिषत गीता विष्णुनामसहस्त्रकम ।

श्रीरुद्रं पौरुषं सौरं जपन्मुच्येत बंधनात  ॥

 

          अर्थ : ऐतरेय उपनिषद, गीता, विष्णुसहस्त्रनाम, रुद्र, पुरुषसुक्त व सौरसुक्त यांच्या नित्य पठनाने मनुष्य बंधनमुक्त होतो. एके दिवशी स्वामींना ‘ आसने व प्राणायाम शिकावयाचा आहे ’ अशी प्रार्थना केल्यावर त्यांनी आसने, प्राणायाम, षटक्रिया, मुद्रा व अजपाजप इ. शिकवले.

          गुळवणी महाराजांनी श्रीदत्तात्रेयांची आणि इतर अनेक अतिशय सुंदर आणि प्रासादिक चित्रे काढली आहेत. त्यांनी बार्शी येथे चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये ते नूतन मराठी विद्यालयामध्ये चित्रकला शिकवित असत. त्यांचा मुक़्काम नारायण पेठेत होता. यादरम्यान त्यांची भेट प. प. लोकनाथतीर्थ स्वामी उर्फ बंगाली स्वामी यांचेबरोबर झाली. त्यांनी त्यांचेवर पूर्ण कृपा केली आणि योग्य वेळ आल्यावर त्यांना शक्तीपाताचे दीक्षाधिकार दिले. त्यांनी पुण्यामध्ये “वासूदेवनिवास” हा आश्रम सुरु केला.  त्याला दक्षिणकाशी समजले जाते. दक्षिण भारतातील शक्तीपाताच्या कार्याचे ते प्रमुख पीठ बनले. त्यांनी शक्तीपाताच्या प्रचार प्रसाराबरोबरच प. प. टेंब्ये स्वामींचे सर्व साहित्य एकत्र करुन ते प्रकाशित केले. त्यांनी केलेले सर्वांत मोठे कार्य म्हणजे, श्रीनृसिंहवाडी या दत्तक्षेत्राचा जीर्णोद्धार. नृसिंहवाडी ही श्रीटेंब्येस्वामींची प्राणप्रिय कर्मभूमी. इथे उपासना करणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून घाटावर, देवाभोवती भव्य सभामंडप, मागील ओवऱ्यांची दुरुस्ती, दक्षिणाभिमुखी उत्सवमूर्ती पूर्वाभिमूख करुन, खिडकीतून स्वारीचे दर्शन अशांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी गुळवणी महाराजांनी घडवल्या. तीर्थयात्रा, संतसत्कार, विद्वानांचा सन्मान, दत्तसंप्रदायाचा व शक्तीपातविद्येचा प्रसार, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्राधान्याने त्यांनी केल्या.

          अशा या दत्तस्वरुप योगिराज गुळवणी महाराजांचे जन्मठिकाण म्हणजे कुडूत्री हे गाव. हे ठिकाण अत्यंत रमणिय असून पूर्णता: ग्रामीण वळणाचे सर्व निसर्गसौदर्य तेथे आहे. तीथे गेल्यावर त्या भूमीतील दैवी स्पंदनांची जाणीव आपल्याला होते. त्या ठिकाणी राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजनाची व्यवस्था आहे. तिथे आधी फोन करुन गेल्यास सोय होऊ शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

 

श्री सद्गुरु सिद्धयोग योगिराज १००८

गुळवणी महाराज न्यास – १४७० ए,

महाकाली मंदिराजवळ, तोरो राममंदिर,

कोल्हापूर. (०२३१) २६२२०८४ / २६२६०५९ / ९४०४२५६७१७

 

प.पू. श्रीगुळवणी महाराजांच्या कार्याचे मुख्य केंद्र श्रीवासुदेव निवास पुणे येथे आहे.

अधिक माहितीसाठी तेथेही संपर्क साधता येइल.

 

श्रीवासुदेव निवास, ४२/१७, एरंडवणे, कासट साडी सेंटरमागे, नळस्टॉपजवळ, कर्वे रस्ता,

पुणे ४११००४  फोन – ( ०२० ) २५४५५५८४ 

वेबसाईट – www.vasudevniwas.org

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon