श्रीक्षेत्र कुरवपूर

          श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार होय. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. त्यांनी गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी वस्तव्य केले. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते या ठिकाणी होते. त्यांच्या अनेक लीला या ठिकाणी घडल्या आहेत. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूका असून प.प. टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये प.पू. श्रीधर स्वामींनी देखिल वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी प.प. टेंबेस्वामींनी सर्वसामान्य आबालवृद्धांना संकटातून मुक्त करणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे. त्यांनी येथे एक चातुर्मास केला होता. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी तपश्चर्या केली आहे.

          कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे. हे खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे . तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ – जितामित्रबेट, नारगड्डि ( नारबेट ) आणि कुरुगड्डि. या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरुगड्डिच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपादस्वामी राहात असत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुरवपूर येथील लीला विलक्षण आहेत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता. पण त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही त्याला सुधारण्यासाठी बापाने खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. आपल्या प्रयत्नांत अपयशी होऊन एके दिवशी बापाने इहलोकची यात्रा संपविली. त्या मुर्ख मुलाला सांभाळता सांभाळता आईला जीव नकोसा झाला. कितीही प्रयत्न केले तरी त्याला थोडी सुद्धा विद्या प्राप्त होत नसे. “ आता मी काय करू ? ” म्हणून एके दिवशी त्याने गावातील लोकांना विचारिले तेव्हा त्यांनी ‘ मरून जा ’ म्हणून चेष्टा केली. लोकांचे म्हणणे ऎकून त्याने तसेच आईला जाऊन सांगितले. “ तुझ्या बरोबर मीही येते ” आई म्हणाली या प्रमाणे दोघेही जीव देण्यासाठी कृष्णा नदीकडे भर दिवसा निघाले. नदीला पोहचताच त्यांना श्रीपादस्वामी दिसले. त्यांच्या दर्शनाला गेले आणि आपली सगळी हकीकत सांगून “आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नसल्याने आपण आत्महत्या करीत आहोत; तेव्हा आपल्याला आत्महत्येचा दोष लागू नये म्हणून आपल्या दर्शनाला आलो आहोत. आता आपले दर्शन झाले. आत्महत्येला परवानगी मिळावी” म्हणून विनंति केली. श्रीपादस्वामींनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले; त्यांनी मूर्ख मुलाकडे आपली कृपादृष्टि फिरविली आणि त्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेविला. लगेच तो मुर्ख मुलगा वेदशास्त्र संपन्न झाला. ही महदाश्चर्याची घटना घडताच आई व मुलगा स्वामींना शरण गेले. नंतर त्या स्त्रीने “पुढच्या जन्मी आपल्या सारखे ज्ञानी पुत्र व्हावे” म्हणून प्रार्थना केली तेव्हा तिला स्वामींनी शनिप्रदोषाचे व्रत व त्याचा महिमा समजाऊन सांगून “जर तू या व्रताचे चांगल्या प्रकारे पालन केल्यास मीच तुझा पुत्र होईन” म्हणून वचन दिले.

            दुसरी कथा एका धोब्याची आहे. तो रोज गावातील कपडे गोळा करून नदीस नेऊन धुणे हे त्याचे काम होते. श्रीपादस्वामी देखील दररोज स्नानान्हिकासाठी नदीला येत असत. श्रीपादश्रीवल्लभस्वामी नदीस येतांना व नदीहून परत जातांना संधिची वाट पहात असलेला धोबी दुरून त्यांना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घालत होता. हा कार्यक्रम न चुकता काही दिवस चालल्यानंतर एके दिवशी स्वामी त्या रजकाशी बोलले- “हे रजका, तू दररोज न चुकता संधि साधून नमस्कार करतोस; यासाठी किती तरी कष्ट घेतोस. आता सुखाने राज्य करीत रहा.” असे म्हणून स्वामी निघून गेले. काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतु आला तेव्हां त्या भागाचा म्लेंछ राजा नौकाविहारासाठी मोठ्या थाटामाटाने आला. त्याचा तो डामडौल रजक देहभान विसरून टक लावुन पहात राहिला. स्वामी महाराजांनी त्याला बोलावून विचारले, “हे रजका, मनांत काय विचार चालले आहेत?” धोबी म्हणाला, “ कोणत्या गुरुच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे? असले सुख मला का मिळत नाही म्हणून मन उद्दिग्न झाले आहे. ” तेव्हा श्रीपादस्वामींनी म्हणाले, “जन्मल्यापासून तू गरीब. असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस. यासाठी तू राज्यसुख अनुभवायास पाहिजे. ते तू आताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी?” रजक म्हणाला “स्वामी आता मला राज्य नको. मी म्हातारा झालो. राज्यसुख अनुभवावे ते तारुण्यांत. तेव्हामला पुढच्या जन्मी राजा करा.” लगेच धोब्याच देह तेथेच पडला; आणि प्राणपक्षी उडून बीदरच्या राजाचा मुलगा होऊन प्रकट झाला. श्रीपादस्वामीदेखील श्री नृसिंह सरस्वती होऊन गाणगापुरांत रहात होते. तिकडे बीदरचा युवराज मोठा होऊन राजा झाला होता आणि राज्यमुख अनुभवीत होता. असे असतांना त्यांच्या पायाला करट झाले. रोग लहान असला तरी दिवसे दिवस ती जखम कमी न होता चिघळतच राहिली आणि शेवटी जुनाट व्रणाचे उग्र स्वरुप धारण केले. सर्व हकीम आणि नामांकित वैद्य थकले आणि त्यांनी सांगितले की ‘ही जखम कोणत्याही औषधोपचारांनी बरी होणारी नव्हे तर ती थोर साधु सत्पुरुषांच्या दर्शनाने आणि त्यांच्या अमृत दृष्टीने बरी होणारी आहे.’ तेव्हा असे ऎकून बादशाह लगेच तेथे गेला. तेथील लोकांनी सांगितले की असले साधुसत्पुरुष गाणगापूरात राहतात. राजा तेथून प्रवास करीत गाणगांपुरात येऊन पोहोचला. ‘ श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी संगमांत आहेत ’ असे ऎकून तिकडे धावला. बादशहाला पाहतांच श्री नरसिंहसरस्वती स्वामी म्हणाले, “काय रे परिटा, सुखी आहेस ना? फार दिवसापासून भेटला नाहीस.” बादशहास पूर्वजन्माची आठवण झाली. पायावरील जखम बरी झाली. आपण कुरवपूरचा धोबी आणि समोरचे स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमुर्ति असे त्याला कळून चुकले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहु लागले. तो म्हणाला, “ काय भाग्य आहे ! महागुरो, पुन: आपले दर्शन झाले. जन्मोजन्मी आपली कृपा माझ्यावर आहे हे मी ओळखले आहे. आता आपण आपल्या या परिटाच्या घरी यावे. आपण दिलेले राज्य पहावे. मुलांबाळांना आशिर्वाद द्यावा.”

          वरील प्रमाणे बादशहाने प्रार्थना केली. आणि लगेच एक पालखी आणवून पुढे उभी केली. तेव्हा श्री गुरुंनी सांगितले की “ आतांच नको, तू पापविनाशी तीर्थाला चल: तेथे येऊन आम्हाला भेट. तेथून तुझ्या नगराला जाऊया.” तेव्हा बादशाह थोडासा निराश झाला. “ माझ्यावर श्रद्धा असलेला तू माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही काय? अनुमान करु नकोस, पुढे चल.” असे म्हणून त्याला पुढे पाठवून श्रीगुरु संगमात अदृश्य होऊन पापाविनाशी तीर्थात प्रकट झाले. तेथून बादशहाने आपल्या राजवाड्यापर्यंत सकल राज वैभवानिशी श्रीगुरुंना पालखीत बसवून राजरस्त्यावरून मिरवीत नेऊन आपल्या सिंहासनावर बसविले आणि सहपरिवार श्रीगुरुंची पाद्यपूजा केली.

          कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपादस्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सुर्यनमस्कार घालित असत. कुरवपुरला अग्रहार असे म्हणत असत. कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैद्राबाद रस्त्यावर मत्कल गावाजवळून कुरवपुर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून नावेने कुरवपूर याठिकाणी जाता येते. त्याला स्थानिक भाषेत कुरगड्डि असे म्हणतात. कुरवपुरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा उपलब्ध आहेत. आधी सांगितले असता भोजनाची व्यवस्था होवू शकते. मंदिराच्या बाजूला काही अंतराअर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. तेथेच थोडे पुढे प.प. टेंबेस्वामींची गुहा आहे. तेथेही एक धर्मशाळा आहे.

          कुरवपुर या ठिकाणी नित्य पूजा अर्चा अभिषेक आणि अनुष्ठाने इ विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्ट्य आहे. हे स्थान अतिशय प्राचीन आणि जागृत असून तेथिल अनुभूती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

मो. ०९४४८५६८१४८३  फोन : (०८५३२) २८०५७०  

श्री. रविभट्ट एस. पुजारी   (०८५३२) २८००८८

श्री. राजेंद्रभट्ट एस. पुजारी : ०९९७२५५९८१८ / ०९३४२७११६४०

ईमेल : vkpujar_mvpujar@hotmail.com

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon