श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी

          प.प. भगवान श्रीधरस्वामी यांचे जन्मठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी. हे स्थान गाणगापूर पासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आळंद तालुक्यामध्ये आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे. श्रीधरस्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. नारायणराव देगलूरकर हे हैद्राबाद येथे राहणारे एक सुखवस्तू गृहस्थ होते. एकदा त्यांचे उपाध्याय त्यांना म्हणाले, “नारायणराव, तुम्हाला गाणगापूरला जावून अनुष्ठान करायला हवे. तुमच्या पोटी एक महान पुत्ररत्न जन्माला येणार आहे. गाणगापूरला तुम्हाला श्रीदत्तात्रेयांचा प्रसाद मिळवायला हवा. त्यानेच तुमच्या घराण्याचा भयंकर सर्पशापातून मुक्तता होईल.” नारायणराव आणि कमळाबाई यांना दोन मुले होती. परंतु त्यांना आपल्या घराण्याला असणाऱ्या सर्पशापाबद्दल माहिती होती. त्यानंतर नारायणराव आणि कमळाबाई गाणगापूरला गेले आणि तिथे त्यांनी कडक अनुष्ठाने सुरु केली. गुरुचरित्राची पारायणे करताना नारायणराव श्रीगुरुंच्या अगाध लीलेशी एकरुप झाले. एके दिवशी श्रीदत्तात्रेय समोर प्रकटले आणि त्यांनी श्रीफळाचा प्रसाद दिला आणि आपली इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. एका दिव्य आनंदाने त्यांची मने भरुन गेली. कमळाबाईंचे माहेर लाडाच्या चिंचोळीचे. तेव्हा त्यांच्या आईने बाळंतपणासाठी कमळाबाईंना चिंचोळी येथे आणले. तिथे त्यांची दुसरी मुलगी देसायांच्या घरामध्ये दिलेली होती. ते घर समृद्ध होते. बाळंतपणासाठी घरी आलेल्या आपल्या मेहुणीला श्रीदत्तात्रेयांचा वरप्रसाद लाभलेला आहे हे देसायांना माहित होते. त्यामुळे कमळाबाईंची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली होती. नऊ मास पूर्ण भरले आणि एका दिव्य पुरुषाने जन्म घेतला. त्यांचेच नाव श्रीधर स्वामी. श्रीधरस्वामी हे समर्थ संप्रदायातले. त्यांनी समर्थ रामदासांना आपले गुरु मानले होते. लहानपणीच वडीलांचे छत्र हरपले. अतिशय कष्टातून त्यांचे लहानपण गेले. त्यांचा अध्यात्माकडे विलक्षण ओढा होता. हैद्राबादहून नंतर ते पुण्यात येवून राहिले. सदाशिव पेठेतील नृसिंहमंदिरामध्ये त्यांनी बराच काळ वास्तव्य केले आणि तप:साधना केली. त्यानंतर ते सज्जनगडावर गेले. तिथे त्यांना प्रत्यक्ष समर्थ रामदासांनी दर्शन देवून अनुग्रह दिला. तिथे त्यांची सेवा आणि साधना सुरू होती. त्यांच्यावर प्रसन्न होवून प्रभू रामचंद्रांनी त्यांना साक्षात दर्शन दिले.

          श्रीधरस्वामी यांनी फार मोठे कार्य केले आहे. समर्थांच्या आज्ञेवरून ते कर्नाटकामध्ये गेले. हुबळी, शिमोगा, शिरसी या परिसरामध्ये त्यांनी समर्थ कार्य जोमाने वाढविले. तेथे त्यांचा मोठा शिष्य परिवार जमला. स्वामींनी विधिवत संन्यास घेतला होता. संपूर्ण देशात त्यांनी भ्रमण केले. बद्रिनाथ, चारधाम, गिरनार, अयोध्या, वाराणसी, होशंगाबाद, कन्याकुमारी इ. अनेक ठिकाणी त्यांचे चतुर्मास झाले. हिंदू संस्कृतीबद्दल त्यांना अपार प्रेम आणि कळवळ होती. भारताची आणि विशेषत: हिंदूंची अवस्था पहून त्यांचा जीव कळवळत असे. त्यांनी वेद, उपनिषदे यांच्यावर अत्यंत सोप्या भाषेमध्ये भाष्य केले आहे. संपूर्ण देशभरात त्यांनी हिंदूधर्माची पताका उंचावून धरली. शेवटी ते शिरसीजवळील सागरजवळ वरदहळ्ळी यागावी जावून राहिले. तेथेच त्यांची समाधी आहे.

          श्रीधरस्वामींनी श्रीदत्तसंप्रदायासाठी अत्यंत मोलाचे कर्य केले आहे. गेल्या काही दशकातील ज्या दोन श्रीदत्त स्थानांनी सर्वांना वेड लावले ती श्रीक्षेत्र पीठापूर आणि श्रीक्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणण्यासाठी श्रीधरस्वामींचीच प्रेरणा होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याच संकल्पाने ही स्थाने प्रकाशीत झाली असे म्हणता येईल. श्रीधरस्वामींचे शिष्य प.प. सज्जनगड रामस्वामी यांनी पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना केली. याचबरोबर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळे श्रीदत्तभक्तांना एक विलक्षण पर्वणी मिळाली. याचबरोबर श्रीधरस्वामी १९६० साली कर्दळीवनामध्ये गेले होते. त्यांचे शिष्य गाणगापूरचे बटू महाराज नंतर कर्दळीवनात गेले होते. त्यांच्याच प्रेरणेने गाणगापूर येथील काही पूजारी १९९९ साली प्रथम कर्दळीवनामध्ये गेले. त्यानंतर कर्दळीवनाची महिती हळूहळू सर्वांना कळू लागली आणि ते प्रकाशात आले. श्रीधरस्वामींच्याच कृपेने आणि संकल्पाने गेल्या दशकभरामध्ये दत्तसंप्रदायामध्ये एक नवचैतन्य पसरले आहे.

          लाडाची चिंचोळी हे श्रीधरस्वामींचे जन्मठिकाण म्हणूनच अतिशय पवित्र आहे. भाविक भक्तांनी भेट देवून तेथील अनुभूती घ्यावी. अधिक माहितीसाठी

श्री. दिनकर देशमुख श्रीधरस्वमी जन्म संस्थान, श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी, ता. आळंद जि. गुलबर्गा फोन : ०९९७२७१२९६८

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon