श्रीक्षेत्र लातूर

          श्रीक्षेत्र लातूर या ठिकाणी श्रीसदानंद दत्तमठ या नावाचे स्थान आहे. हे दत्तात्रेयांचे शक्तीपीठ असून येथे निर्गुण पादुका आहेत. लातूर औसा रोड या मार्गावर लातूर शहरातच दत्तनगर या भागामध्ये हे दत्तपीठ आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या निजशिष्यामध्ये एक शिष्य नंदीनामा या नावाचे होते. त्यांचे घराणे गुलबर्गा जवळील आळंद तालुक्यातील कौलगा या गावातील होते. तेथे सदानंद पीठास्थान आहे. गुरुचरित्रामध्ये नंदीनामाचा उल्लेख एका अध्यायामध्ये आला आहे. यानुसार नंदीनामा नावाचा ब्राह्मण त्याला कोड झाल्यामुळे तुळजापूर येथे येवून राहिला होता. त्याने देवीला साकडे घातले होते. तुळजापूरच्या देवीने त्याला चंदला परमेश्वरी देवीकडे पाठविले. तिने त्यांना गाणगपूरी पाठविले आणि सांगितले की तिथे प्रत्यक्ष दत्तप्रभू मानवी देहात यती रुपामध्ये वास करून राहिले आहेत. परंतु त्याचा विश्वास बसला नाही. शेवटी तो गाणगापुरास आला आणि त्याने नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. त्याचे गर्वहरण करून महाराजांनी त्याचेवर कृपा केली. गुरुकृपेने तो महाकवी बनला. कोणताही विद्याभ्यास नसताना त्याने गुरुगीता हा अद्भुत ग्रंथ लिहला. तेव्हा प्रसन्न होवून चंदला परमेश्वरी देवीने त्याला सोन्याचे कंकण देवून आशिर्वाद दिला. याच घराण्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये एका साधु सत्पुरुषाने जन्म घेतला. वाडी येथील योगी पुरुष श्रीगोपाळस्वामी आणि थोरल्या बाजीरावाचे गुरु ब्रह्मानंद सरस्वती हे याच कुळामध्ये जन्मले आहेत. या नंदीनामाच्या वंशामध्ये कौलगा या गावी एकदा श्रीस्वामी समर्थ आले होते. त्यांनी मागील श्रीनृसिंह सरस्वती अवतारामध्ये मी तुमच्या घरी आलो होतो, असे सांगून जिथे बसलो होतो, ती जागा दाखविली आणि भंडारा करायला सांगितला. याच वंशातील यती प.पू. गोविंदानंद सरस्वती उर्फ बालस्वामी यांना एक दिवस दृष्टांत झाला आणि सदानंद पीठाची सेवा करण्याची आज्ञा झाली. त्यांनी पुष्कळ काळ तेथे सेवा केली. त्यानंतर ते आपले गुरु श्रीमाधव सरस्वतींच्या गुप्त स्थानाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यांचा शोध करित ते लातूर या ठिकाणी आले. लातूरचे पूर्वीचे नाव रत्नपूर असे होते. तेथे त्यांना अलक्षपुरीचा आश्रम हे स्थान सापडले आणि तोच आत्ताचा सदानंद दत्तमठ आहे. निरंजन वनातील ते गुप्तस्थान म्हणजे तेथे पुरातन काळी वडाची खूप झाडे होती. पिंपळ वृक्ष होता. त्या जमीनीचा सात एकरचा भाग त्या संपादन केला. त्यास्थानात २५ फूट विशिष्ठ जागेत खोल खणल्यानंतर पुरातन वास्तू लाभली. त्या जागेच्या जीर्णोद्धारा करिता १२ वर्षे तप साधना करावी लागली. त्या ठिकाणी अनेक गूहा व समाधीचा भाग आहे. पादुका स्वयंभु आहेत. त्या माधव सरस्वतींस प्रसाद म्हणून मिळालेल्या आहेत. तसेच शिवलिंग व बाण आहेत. समधीवरील डब्यात ते पूजेत असतात. याच परिसरात एक यज्ञकुंड गवसले. तेवढाच भाग केंगल पद्धतीचा लाल दगडाचा आहे. बीदर परिसरात दरी पट्टीत असे ठिसूळ दगड फरशीने तासून त्यापासून बांधकाम करण्याची पद्धत सर्रास आहे. त्या केंगल असे संबोधतात. या पूजा स्थानात ज्या पादुका आहेत त्या तीन आहेत. गाणगापूर, नरसोबावाडी औदुंबर येथे सर्वत्र दोनच पादुका आहेत. पण येथे ३ पादुका आहेत. चार पट्ट्या अष्टधातूच्या व चार पट्ट्या काष्टाच्या असून हे सर्व शिलाखंडात व्यवस्थित ठेवलेले आढळतात. या परिसरामध्ये अजानवृक्ष, पिंपळ, बिल्व इ सर्व वृक्ष फोफावलेले आहेत. भव्य सभा मंडप, सुंदर देवालय आणि तो प्रसन्न परिसर पाहून एक आगळे वेगळे समाधान लाभते. याठिकाणी नित्य आणि नैमित्तिक पूजा अर्चा आणि उत्सव साजरे केले जातात. याठिकाणी श्रीनृसिंहसरस्वती महाराज एक वर्षे येवून एकांतामध्ये राहिले होते, असा उल्लेख श्रीगुरुचरित्रामध्ये आहे.

वैजनाथ सन्निधानी l अंबार आरोग्यभवानी l

तितुकेच अंतर पुढे जाऊनि l श्रीगुरु राहिले संवत्सर एक l l

          श्रीसदानंद दत्तपीठाला भेट दिल्यावर एक अपूर्व आनंदाची अनुभूती येते. येथे भक्तनिवास कार्यालयामध्ये राहण्याची आणि भोजन प्रसादाची सोय होवू शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

फोन : (०२३८२) २४११३१ / ९८५००४९५९९

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon