श्रीक्षेत्र माहूर

          श्रीदत्तात्रेयांचे निद्रास्थान म्हणून माहूर प्रसिद्ध आहे. कृतयुगाच्या अखेरीस श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मा-विष्णू-महेश यांनी एकत्र रुप धारण केले, तो अविनाशी अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय. अत्री आश्रमात अनसूया मातेच्या उदरी भगवान श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. ते ठिकाण म्हणजे आजचे अनसूया मातेचे मंदिर व भगवान श्रीदत्तात्रेय हे आपल्या मातृभूमीवरम्हणजे माहूरगडावर नित्य निवास करु लागले. श्रीक्षेत्र माहूर दर्शनाच्या आधी अनसूया मातेचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.

         समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले व लक्ष्मीचे अंगभूत असलेले काळ्या आवळीचे झाड प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी श्रीक्षेत्र माहूरगडावर स्थापले. त्यावरून माहुरगडास कृतयुगात अमलकी ग्राम असेही नाव आहे. ह्याच काळात आवळीच्या झाडाखाली देवल्य ऋषींनी तप:श्चर्या केली व त्यांना भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले. जेव्हा देवल्य ऋषी अमलकी ग्रामी काळ्या आवळीच्या वृक्षाखाली तप:श्चर्या करीत असताना गंगेवरून स्नान करून येताना त्यांनी तीन मूठ वाळू आणून महादेवाच्या लिंगाची स्थापना केली. देवल्य ऋषींच्या तप:श्चर्येच्या प्रभावाने लिंग प्रत्येक दिवशी वाढू लागले व त्या लिंगाच्या सभोवार प्रखार अग्नीचे दिव्य तेज प्रकटले होते. त्या लिंगाच्या तेजाने तिन्ही लोक दिपून गेले त्यामुळे देवलोकसुद्धा भयकंपित झाला. सर्व देव विष्णूजवळ गेले. तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूनेसुद्धा ह्या भयातून मुक्ती मिळविण्याकरिता सह्याद्री शिखरावरील भगवान दत्तात्रयाचा मार्ग दाखविला. भगवान दत्तात्रेयच ह्या संकटातून देवांना मुक्ती देतील असे सांगितले. देवांची अर्चना ऎकून भगवान दत्तात्रेयांनी त्यांनी आशीर्वाद दिला व जेव्हा देवल्य ऋषी स्नानाकरिता गंगेवर गेले होते, तेव्हा काळी आवळीच्या पूर्वेला असलेल्या देवल्य ऋषींच्या आसनावर बालकांचे रुप धारण करून जाऊन बसले. स्नानावरून परतल्यावर जेव्हा देवल्य ऋषींनी हे दृश्य पाहिले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले व ह्या बालकाला भस्म करून टाकण्याचा निश्चय करून आधी लिंगपूजेकरीता गेले. तेव्हा तो बालकसुद्धा लिंगाजवळ आला तेव्हा देवल्य ऋषींने ओळखले की एवढ्या अलौकिक तेज:पुंज लिंगाजवळ कुणीही येऊ शकत नाही. आपण ज्या परब्रह्म अविनाशी दत्तात्रेय दर्शनासाठी आतूर आहोत, तेच हे भगवान दत्तात्रेय आहेत हे समजल्यामुळे ऋषी अत्यंत आनंदित झाले. ऋषींची पूजा चालूच होती. फुले पिंडीवर वाहत असताना त्या बालकानेही फुले बाहण्यास मागितले. फुले वाहण्यापूर्वी भगवंतांनी प्रथम त्या लिंगात असलेल्या ज्वालामुखीचे शमन केले आणि आपल्या उजव्या हाताच्या कनत्रिकेने त्या भव्य आणि दिव्य लिंगाचा माथा दाबला. तोच ते लिंग अती वेगाने खाली दबत चालले. हे पाहताच देवल्य ऋषींचा गर्व नाहिसा झाला. लिंग साडेतीन हात उरले आहे, हे पाहताच ऋषींनी भगवान श्रीदत्तात्रेयांना प्रार्थना की, आपले कृपाशीर्वाद म्हणून हे साडेतीन हात लिंग तेथेच असू द्यावे. तेव्हा भगवान दत्तात्रयांनी ऋषींची विनंती मान्य करून ते लिंग तसेच ठेवले. तेव्हा सर्व देव, ऋषी, मुनींनी दत्तात्रेयांची मोठ्या आनंदाने प्रार्थना केली. तेव्हापासून त्या लिंगाचे देवदेवेश्वर हे नामाभिमान झाले. प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेयांनी देवल्य ऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा चंद्र, सूर्य, पृथ्वी असेपर्यंत ह्या ठिकाणी नित्य निद्रा घेण्यास यावे असे विनविले. तेव्हापासून भगवान दत्तात्रय हे ह्या ठिकाणी नित्य निद्रा घेण्यास येतात. म्हणून सह्याद्रीवरील देवदेवेश्वर हे क्षेत्र श्रीदत्तात्रेयांचे निद्रास्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

          सैह्यांचलपर्वताच्या शिखरावर श्रीदत्तात्रेयांचा नित्य निवास आहे. ते स्थान श्रीदत्त शिखर म्हणून परमपावन आहे. श्रीदत्तात्रेयांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिखरावर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने शीवलिंगाची स्थापना केली, असा पुराणात उल्लेख आला आहे. तोच दत्तात्रेय आश्रम म्हणजे माहूरगडचे श्रीदत्त शिखर. ह्याच दत्तशिखरावर एक धुनी आजही तेवत आहे. ही भगवान दत्तात्रयांची धुनी म्हणून परम पवित्र आहे. ही धुनी त्रेतायुगामध्ये पिंगल नागपमुनींनी तेवविली, ती अजूनही सुरू आहे. त्रेता, द्वापार व कलियुगापर्यंत केवळ त्या धुनीमध्ये गाईच्या शेणाची गोवरी अखंड लावणे चालू असून त्या धुनीत कधीच विस्तव टाकलेला नाही. भगवान श्रीदत्तात्रेयांचा नित्य संचार व निवास ह्या सह्याद्री पर्वतावर आहे.

           श्रीक्षेत्र माहूर हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. तेथील रेणूका मातेचे मंदिर हे एक जागृत शक्तीपीठ आहे. तेथे प्रत्यक्ष परशुराम हे विष्णूचे चिरंजीव अवतार वास करून रहात होते. जमदग्नी ऋषींचा आश्रम तेथे होता. लाखो लोकांची कुलस्वामिनी श्रीरेणूका माता आहे. तिचे महात्म्य फार मोठे आहे. एकदा प्रत्यक्ष ब्रह्मदेवास वेद आणि उपनिषदांचे ज्ञान आठवेना. खूप प्रयत्न केल्यावर थकून ब्रह्मदेव श्रीदत्तात्रेयांकडे गेले आणि त्यांची प्रार्थना केली. तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्यांना रेणूका मातेची आराधना करावयास सांगितली. त्यानंतर त्यांना पून्हा वेदांचे आणि उपनिषदांचे ज्ञान झाले.

           माहूरगड हा नांदेड जिल्ह्यात आहे. तेथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

अधिक माहिताकरीता संपर्क साधावा.

भक्त मंडळ, श्रीक्षेत्र माहूर, ता माहूर, जि. नांदेड – ४३१७२१ फोन : (०२४६०) २६८४१६

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon