श्रीक्षेत्र माणगाव

          श्री दत्तसंप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य (श्री. प. प.) वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पिठापूर ( आंध्रप्रदेश ) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्री. नृसिंहसरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खूले केले. प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी “ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” हा महामंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. त्याच बरोबर प्रमुख अशा श्रीदत्त स्थानामधील नित्य दिनचर्या देखील स्वामी महाराजांनी ठरवून दिली अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय.

          श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी म्हणजेच थोरले महाराज होत. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. श्रींची संकल्पशक्ती, त्याग, ज्ञान, ईश्वरनिष्ठा, श्रीदत्ताज्ञापालननिष्ठा हे सर्वच अलौकीक आहे. श्रींनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी, मोजक्या वस्त्र – वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास केला. त्यांच्या भ्रमणात देवदेवता, पवित्र तीर्थे यांचे सान्निध्य व परमानंदाचा अनुभव असे. सदैव ध्यान , तपश्चर्या, लेखन, प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे.

          श्री. प. प. स्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रुपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील. अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. ‘ हे मी लिहिले ’ असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात, तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत. श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपूल ग्रंथ संपदा निर्माण केली.

          श्री दत्तसंप्रदायाचा आधारभूत ग्रंथ श्री गुरुचरित्राच्या ग्रंथात साडेसात हजार ओव्या आहेत. एवढा मोठा ग्रंथ फक्त दोन हजार ओव्यांमध्ये संस्कृत भाषेत याच श्री क्षेत्री माणगाव येथे त्यांनी पूर्वाश्रमात लिहिला. या ग्रंथाला द्विसाहस्त्री गुरुचरित्र असे म्हणतात. स्वत:जवळ मूळ ग्रंथ नसताना या द्विसाहस्त्री ग्रंथातील प्रत्येक श्लोकावर संस्कृतमध्येच टिका (विवरण) प्रभास व द्वारका येथे इ. सन १८९९ साली लिहिली. इ. स. १८९२ मध्ये ब्रह्मावर्त येथे श्री गुरु संहिता म्हणजेच समश्लोकी गुरुचरित्र म्हणजे श्री गुरुचरित्रातील श्लोकांचे संस्कृतमध्ये भाषांतर केले. हे सर्व मोठे ग्रंथ तयार झाले असल्याने व श्री गुरुचरित्र सर्वांनाच वाचता येणार नसल्याने समाजातील सर्व लोकांना कमी वेळात पारायण करता यावे म्हणून सात हजार ओव्या असलेला ग्रंथ १/१० एवढा संक्षिप्त करुन ७०० ओव्यात १९०४ साली ब्रह्मावर्त येथे लिहला. हा ग्रंथ म्हणजेच श्री सप्तशतीगुरुचरित्रसार. समाजातील सर्व भक्तांसाठी हा ग्रंथ लिहिला. याचबरोबर त्रिशती गुरुकाव्य, श्रीदत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्री दत्तचंपू, शिक्षात्रयम (कुमारशिक्षा, युवाशिक्षा, वृद्धाशिक्षा) तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्र विषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षीक जोतिषाची स्वत:ची अशी पद्धत तयार केली. तसेच स्त्री शिक्षा, लघुमननुसार (मराठी), माघमहात्म्य (मराठी) हे ग्रंथ मराठीत तयार केले. याचबरोबर श्री घोरात्कष्टोधरण स्तोत्र, पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्यउपासनाक्रम, श्री दत्तात्रेय षोडशावतार चरित्र, श्री सत्यदत्तपूजा व कथा लिहिल्या आहेत.

          कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगांवातील श्री. गणेशभटजी टेंब्ये व सौ. रमाबाई यांच्या पोटी शके १७७६ श्रावण कृष्ण पंचमीस रविवार दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर ते त्रिकाल संध्या, नित्य पंचयज्ञ, श्री गुरुचरित्र वाचन करीत असत. कोरी भिक्षा मागून स्वत: स्वयंपाक करुन वैश्वदैव, पंचयज्ञ – नैवैद्य करुन भोजन करत असत. नित्य आन्हिक करु लागले. त्याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषाभ्यास तसेच अष्टांग योगाभ्यासही सुरु केला. आपल्या मंत्रसिद्धीच्या सहाय्याने आणि उपाय सांगून त्यांनी अनेकांच्या भूतबाधा सोडवल्या. अनेकांना पिडामुक्त केले व अनेक भक्तांना उपासना देऊन सन्मार्गी लावले.

          त्यांनी गायत्री पुरश्चरण केले. एकदा स्वप्नदृष्टांतानुसार नृसिंहवाडीला गेले असता तेथे श्री प. प. गोविंदस्वामी या ब्रह्मज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्री दत्तसंप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला. या नंतर इ. स. १८८३ वैशाख शुद्ध पंचमी कागलहून आणलेल्या श्री दत्तमूर्तीची सात दिवसात मातीने बांधलेल्या मंदिरात माणगावी त्यांनी स्थापना केली. साक्षात दत्तप्रभू या मंदिरात राहिले. सात वर्षाच्या कालावधीत श्री दत्तप्रभूंनी येथे विविध लिला केल्या. मंदिर भरभराटीला आले. दर गुरुवारी व शनिवारी प्रचंड गर्दी होत असे.

त्यांनी श्रीदत्ताज्ञेने “ उत्तरेस जा ” या आज्ञेवरुन कोल्हापूर , औदुंबर, पंढरपूर , बार्शी अशी तीर्थक्षेत्रे केली. यानंतर भारतात विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदिंची श्री दत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, उत्कृष्ट वक्ता, सिध्द हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.

अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच क्षेत्री गेली. श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्या मुळे ही भुमी पवित्र व पावन झाली आहे.

माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी या जवळ आहे. येथे भव्य दत्तमंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्त निवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा.

श्री दत्त मंदिर, माणगांव, पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी, ता. कुडाळ,

जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र पिन- ४१६५१९ फोन : (०२३६२) २३६२४५ / २३६०४५

Email: shreedattamandirmangaon@gmail.com

Website: www.shreedattamandirmangaon.org

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon