श्री क्षेत्र माणिकनगर

          माणिकनगर हे उत्तर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त १ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर पासून १४० कि. मी. व हैदराबाद पासून १६० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. गुलबर्गा या स्टेशनपासून हुमनाबाद हे ६० कि. मी. अंतरावर असून तुळजापूर १३२ कि.मी. , गाणगापूर १०४ कि.मी. , अक़्कलकोट १३८ कि. मी. व बीदर ५१ कि. मी. ही अगदी जवळची तीर्थक्षेत्रे आहेत.

        श्री माणिकप्रभूंचा जन्म मंगळवार, २२ डिसेंबर, १८१७ रोजी निजामाच्या राज्यातील लाडवंती या गावी झाला. त्यांचे पिता श्रीमनोहर नाईक व माता श्रीबयादेवी हे दोघेही अत्यंत सात्विक व सदाचारशील दांपत्य होते. त्यांच्या घरी पूर्वीपासून रामोपासना होत असे. इ. स. १८१७ च्या श्रीरामनवमीच्या रात्री त्या दोघांच्या स्वप्नात श्रीदत्तप्रभु प्रकट झाले आणि मी तुमच्या उदरी जन्म घेणार असे सूचित केले. त्यानुसार बरोबर नऊ महिन्यांनी श्रीदत्तजयंतीच्या दिवशीच श्रीप्रभूंचा जन्म झाला.

        बालपणांपासूनच प्रभूंच्या अंगी असलेल्या अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय लोकांना येऊ लागला. त्यांच्या बाललीलेमधून अनेक अद्भुत चमत्कर सहज घडत असत. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील मनोहरपंत निवर्तले. म्हणून त्याची माता बयादेवी प्रभू व इतर दोन भावंडांना घेऊन कल्याणच्या नबाबाच्या पदरी नोकरीस असलेल्या आपल्या भावाजवळ कल्याणास येऊन राहिल्या. लहानपणी प्रभू कोणत्याही शाळेत गेले नाहीत, प्रकृती हीच त्यांची पाठशाळा होती. सवंगड्यांना घेऊन रानात दूर निघून जाणे, दरीत, गुहेत, प्रवाहाच्या ठिकाणी एकांतात बसून राहणे, दोन-दोन तीन तीन दिवस गुप्त होणे हा त्यांचा लहानपणीचा छंद होता. प्रभूंनी विद्याभ्यास करावा, नाव-लौकिक मिळवावा, कुटुंबाच्या योगक्षेमाची काळजी घ्यावी असे त्यांच्या व्यवहारी असलेल्या मामांना वाटायचे. म्हणून त्यांनी प्रभूंना एका जकात नाक्यावर नोकरी मिळवून दिली. पण तिथेही तोच प्रकार झाला. दिवसभर जमा झालेली सरकारी रक़्कम गोरगरिबांत वाटून प्रभू मोकळे होत असत. प्रभूच्या या स्वच्छंद वागणूकीने त्रस्त झालेल्या मामांनी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना घरातून हाकलून दिले. प्रभू जणू याच संधीची वाट पहात होते. त्यांनी नेसलेले धोतर फाडून त्याची लंगोटी केली. मामांना साष्टांग नमस्कार घालून प्रभू घराबाहेर पडले. निघताना प्रभूंनी आपले पहिले पदही रचले- “ प्रभुविण कोण कुणाचा वाली ”. हेच पद गुणगुणत प्रभू निघाले ते सरळ अमृतकुंड या तीर्थाच्या ठिकाणी प्रकट झाले. इथून सुरु झालेल्या तीर्थयात्रेचे पर्यवसान माणिकनगरच्या स्थापनेत झाले. प्रभूंनी १२ वर्षे एकट्याने पायी सबंध भारतवर्ष पालथा घातला. काशी, रामेश्वर, बदरी केदार, हरिद्वार, द्वारका, पुरी, तिरुपती आदि अनेक तीर्थांना प्रभूंनी भेटी दिल्या. या तीर्थयात्रेत प्रभूंनी अनेक रंजल्यागांजल्यांचा उद्धार केला. मतमतांतरातील वैमनस्य दूर करुन सर्व धर्म व संप्रदाय आपल्याला अनुयायांस परमेश्वराची प्राप्ती करुन देण्यात समर्थ आहेत, हे तत्त्व प्रकर्षाने पटवून दिले. या यात्रेसाठी प्रभू जेव्हा निघाले तेव्हा ते एकटेच होते परंतु त्यांची ही यात्रा जेव्हा समाप्त व्हायला आली तेव्हा त्यांच्या सोबत हजारो माणसांचा समुदाय होता, त्यात हिंदू होते तसेच मुसलमानही होते; ब्राह्मण होते, तसेच अठरापग जातीचे लोक होते; शैव होते, वैष्णव होते, शाक्त होते; एका सम्राटालाही लाजविणारे प्रभूंचे ऐश्वर्य होते. इ. स. १८४५  साली प्रभु हुमनाबाद नजीकच्या अरण्यात आले, ही जागा प्रभूंना फार आवडली व इथेच कायम वास्तव्य करण्याच्या दृष्टीने गवताची झोपडी बांधून प्रभू इथेच राहिले. अशा प्रकारे हुमनाबादच्या नजिक गुरुगंगा व विरजा या दोन ओढ्यांच्या संगमावर माणिकनगरची स्थापना झाली. या ठिकाणी एका गवताच्या मांडवात श्रीदत्ताच्या गादीची स्थापना होऊन त्यासमोर प्रभूंचा दरबार भरु लागला. प्रभू भक्तांची मनोकामना पुरविणारे कल्पवृक्ष होते. त्यामुळे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असा चारही प्रकारच्या भक्तांचा मेळावा त्यांच्या भोवती सतत असायचा. त्यांच्या मुसलमान भक्तांनी त्यांना मेहबूब सुबहानीचा अवतार मानून ‘ पीरानेपीर दस्तगीर ’ म्हणून त्यांना गौरविले तर लिंगायत भक्तांनी त्यांना साक्षात बसवेश्वराचा अवतार समजून त्यांची पूजा केली. प्रभू हे सर्व धर्मीयांना आपलेच वाटत होते.

आपल्या भक्तांच्या आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक तापांचे निरसन करुन प्रभूंनी त्यांना ज्ञानयुक्त भक्तीचे धडे दिले. वेदांच्या अद्वैत सिद्धांतावर आधारित ‘ सकलमत संप्रदाय ’ स्थापून प्रभूंनी मतांतराचे ध्येय एक परमेश्वर असून साधना पध्दतीत भिन्नता असल्याचे दाखवून दिले. गरीब – श्रीमंत, कुलीन – अकुलीन, स्त्री-पुरुष, हिंदू – मुसलमान असा कुठला ही भेद न बाळगता प्रभूंनी सर्वांना प्रेम दिले. सर्वांच्या कामना पुरवल्या. सर्वांस सन्मार्गावर आणून सोडले. या प्रक्रियेत नित्य असंख्य अमानुष चमत्कार घडल्याचा प्रत्यय लोकांना सतत येत असे. पण प्रभूंनी कधीही कुठल्याही चमत्काराचे श्रेय आपल्याकडे घेतले नाही. हसून ‘ कर्ता करविता दत्तप्रभू आहे ’, असे ते नेहमी म्हणत असत.

          प्रभू कोणत्याही शाळेत गेले नाहीत तरी त्यांची मराठी, हिंदी, कानडी व उर्दू काव्यरचना पाहिली म्हणजे मोठमोठ्या विद्वानांना आश्चर्य वाटते. प्रभूंनी अनेक भाषेतून विपूल काव्यरचना केली असून वेदांतावर लिहिलेला त्यांचा ‘ आत्मरुपप्रचिती ’ हा ग्रंथ अप्रतिम आहे. शिवाय ‘ मल्हारी महात्म्य’, ‘ संगमेश्वर महात्म्य ’, ‘ हनुमंत जन्म ’ आदि अनेक प्रकीर्ण ग्रंथ त्यांनी रचले आहेत.

           वयाच्या ४७व्या वर्षी प्रभूंनी संजीवनी महासमाधी घेतली. मंगळवार २९ नोव्हेंबर १८६५ मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) ही तिथि सहा महिने आधीच समाधीसाठी निश्चित करण्यात आली होती. फक्त अत्यंत विश्वासातल्या चार शिष्यांना अत्यंत गुप्तपणे समाधीची तयारी करण्याची आज्ञा झाली होती. ठरलेल्या दिवशी प्रात:काळी प्रभूंनी विधिवत संन्यास आश्रम स्वीकार केला. आपल्या कनिष्ठ बंधूंच्या दोन्ही चिरंजीवांना आशिर्वाद दिला. ज्येष्ट पुतने मनोहर श्रीमनोहरप्रभू यांना मंत्रदीक्षा देऊन आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले आणि मग समाधीत प्रवेश केला. शिष्यांस समाधी चिणून घेण्याची आज्ञा केली. श्रीप्रभूंचा सगुण देह जरी दृष्टीआड झाला तरी त्या समाधीच्या माध्यमातून त्यांची चित्शक्ती आजही भक्तांच्या हाकेला ओ देत आहे आणि पूढे येणाऱ्या अनंत काळापर्यंत अशाच प्रकारे ओ देत राहील.

          श्रीप्रभूंच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ पुतणे श्री मनोहर माणिकप्रभू हे वयाच्या सातव्या वर्षी या पीठावर विराजमान झाले. त्यांनीच प्रभूंचे भव्य असे देवालय बांधून संप्रदायाची उपासना पद्धती निश्चित केली. त्यांनी संस्कृतसमेत अनेक भाषेतून उत्तम काव्यरचना केली आहे. नंतर त्यांचे कनिष्ठ बंधू श्री मार्तंड माणिकप्रभू हे वयाच्या सोळाव्या वर्षी गादीवर आले. हे खऱ्या अर्थाने राजयोगी होते. वेदांत, संगित व मंत्रशास्त्र या विषयावर यांचे असाधारण प्रभुत्त्व होते. यांच्या अद्वैत वेदांतावरील ‘ ज्ञानमार्तंड ’ या ग्रंथावर लुब्ध होऊन काशीस्थ पंडितांनी यांना        “ अभिनव शंकराचार्य ” ही उपाधि सादर समर्पित केली होती. यांनीच संप्रदायाचा आसेतुहिमाचल प्रसार केला होता.

          माणिकनगर या दत्तक्षेत्राची आपली एक वेगळी विशेषता आहे. कुठल्याही दत्तक्षेत्रात न दिसणारी अनादि अविच्छिन्न अशी गुरुपरंपरा या क्षेत्राला लाभलेली आहे. या क्षेत्राची दुसरी विशेषता म्हणजे इथे भगवान श्रीदत्तात्रेयांची उपासना ही शक्तीसहित आहे. मधुमती शक्तीसहित दत्तोपासना अन्यत्र कुठेही दिसत नाही. श्रीप्रभूंची तपोभूमी असणाऱ्या या क्षेत्राचे पावित्र्य व शांतता काटेकोरणे जोपासली गेली आहे. येथील तिसरी विशेषता म्हणजे – अन्नदान. ‘ नित्य अन्नदान सेवा ’ या योजनेखाली इथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या दोन्ही वेळच्या भोजनाची नि:शुल्क सोय श्रीसंस्थानामार्फत केली जाते. निरंतर २०० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अत्यंत निष्ठापूर्वक जपली गेली आहे.

येथे राहण्यासाठी भक्त निवासांची सोय उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:

श्री माणिकप्रभू संस्थान, माणिकनगर.

हुमनाबाद तालुका, बीदर जिल्हा, कर्नाटक – ५८५३५३,

दूरभाष : ०८४८३- २७००४२

मोबाईल : ९४४८४६९९१३, ९४४८१२८३८९

Email: maniknagar@gmail.com   Website: www.manikprabhu.org  

 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon