श्रीक्षेत्र मंथनगोड

          कुरवपूर पासून जवळच मत्कल या नावाचे गाव आहे. तेथून जवळच मंथनगोड या नावाचे गाव आहे. तेथे एक मोठा खडक असून त्याला श्रीपाद गुंड म्हणजे श्रीपाद खडक असे म्हटले जाते. तेथेच श्रीदत्तात्रेयांचे एक मंदिर आहे. या ठिकाणी श्रीपाद प्रभूंची एक लीला घडली होती. एकदा श्रीपाद प्रभू कुरवपूर येथे बसले होते. तेव्हा पीठापूरहून वल्लभेश्वर शर्मा नावाचा एक तरूण तेथे आला. तो फार दुरून आल्याने थकला होता. त्याचे स्वागत केले. त्याच्या भोजनाची, विश्रांतीची व्यवस्था इतर शिष्यांनी केली. तो पीठापूरहून आला असल्याने श्रीपाद प्रभूंनी त्याच्याकडे आपल्या नातेवाईकांचे क्षेम कुशल विचारले. त्यावेळी कुरवपूर येथील शिष्यगणांमध्ये सुबण्णा नावाचा एक गरीब शिष्य होता. त्याची मुलगी लग्नाची होती आणि त्याला त्याची चिंता लागून राहिली होती. त्यांनी श्रीपादस्वामींजवळ आपली व्यथा मांडली तेव्हा श्रीपाद स्वामींनी वल्लभेश्वराबरोबर लग्न लावायची सूचना केली. तेव्हा त्या दोघांचे लग्न झाले आणि वल्लभेश्वर पीठापूरला परत गेला. त्याचे भाग्य नंतर उजळले. त्याने व्यापार सुरु केला. व्यापारामध्ये यश मिळाले तर कुरवपूरला येवून सहस्त्रभोजन घालीन असा संकल्प त्याने केला. श्रीपादप्रभूंच्या कृपेने त्याचा व्यापारामध्ये चांगला जम बसला आणि त्याने खूप यश आणि संपत्ती मिळवली त्याने केलेला संकल्प त्याच्या लक्षात होता आणि संकल्पपूर्तीसाठी मोठी रक्कम बरोबर घेवून तो कुरवपूर येथे याववयास निघाला. वाटेत त्याला अजून चार यात्रेकरू भेटले. तेही कुरवपूर येथेच यावयाला निघाले होते. त्याला सोबत मिळाली म्हणून आनंद झाला पण प्रत्यक्षात ते यात्रेकरु म्हणजे चोर होते आणि वल्लभेश्वराकडील संपत्ती लुटायचा त्यांचा बेत होता. मजल दरमजल करीत ते मत्कल जवळील मंथनगोड येथील जंगलामध्ये आले. बल्लभेश्वर सतत तोंडाने श्रीपादप्रभूंचे नामस्मरण करीत होते. रात्रीच्या वेळी सर्वजण झोपले असता ते चोर उठले आणि त्यांनी वल्लभेश्वराचे मुंडके उडविले. त्याच्या कडील थैली त्यांनी घेतली आणि ते पळून जाणार तेवढ्यात तेथे एक यती अवतरला. त्याच्या हातात त्रिशूल होते आणि त्याने रौद्र रुप धारण केले होते. त्याने चारांपैकी तीन चोरांना त्रिशूळाने मारले. चौथा चोर गयावया करू लागला आणि त्याने मी चोर नाही असे सांगितले. तेव्हा श्रीपादप्रभूंनी त्याला माफ केले आणि वल्लभेश्वराचे मुंडके त्याच्या धडाजवळ न्यायला सांगितले. त्याने तसे केल्यावर श्रीपादप्रभूंनी मंत्रून विभूती भस्म त्याला दिले आणि ते वल्लभेश्वराच्या धडावर आणि मानेवर लावण्यास सांगितले. तसे करताच वल्लभेश्वर जणू झोपेतून उठल्याप्रमाणे जागा झाला. वाचलेल्या चोराने त्याला सर्व गोष्ट सांगितली. श्रीपादप्रभूंच्या कृपेने बल्लभेश्वराला खूप आनंद झाला आणि तेथून तो कुरवपूर येथे गेला. श्रीपादप्रभूंच्या चरणी लीन होवून त्याने तेथे सहस्त्र भोजन घातले आणि आपला संकल्प पूर्ण केला.

           हे ठिकाण अतिशय रमणीय असून अजूनही तेथे श्रीपादप्रभूंच्या अस्तित्वाची जाणीव होते. कुरवपूरला जाताना या क्षेत्राला अवश्य भेट द्यायला हवी. कारण तेथे श्रीपाद श्रीवल्लभांची अगम्य लीला घडलेली आहे.

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon