श्रीक्षेत्र नारेश्वर

          बडोद्यापासून ६० कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र आहे. त्याला प्रति गाणगापूर म्हणून ओळखले जाते. दत्त संप्रदायातील एक थोर अवतारी सत्पुरुष प.पू.श्री रंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वरचे महात्म्य फार प्राचीन आहे.

           फार वर्षापूर्वी येथे कपर्दिश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की – मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती. तेथे भयाण अरण्य होते. हिंस्त्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांत स्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज – भजनाचे आवाज स्पष्टपणे ऎकू येत होते. शिवाय तेथे मुंगुस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे प.पू. अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी.

नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पून्हा प.पू. अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका लिंबाच्या झाडाखाली प.पू. अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडूलिंब नम्र होऊन त्याच्या पांद्यांची वाढ वर (उर्ध्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत. इतकेच नव्हे तर प.पू. अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडूलिंबाची पाने गोड झाली आहेत. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे हे होते. त्यांचे पदवीपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. त्यांनी काही काळ नोकरी देखिल केली होती. त्यांचे वडील नोकरी निमित्त गुजरातमध्ये गोधरा याठिकाणी रहात होते. महाराजांच्या वयाच्या ५ व्या वर्षी त्यंचे पितृछत्र हरपले. ते ७ वर्षाचे झाले तेव्हा देवळे या त्यांच्या मूळ गावी त्यांचे उपनयन झाले. परत गोधरा येथे जाताना नरसोबावाडीला जावून पुढे जायचे असे ठरले. त्यावेळी प.पू. वासूदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता. थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांचे चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘ बाळ तू कुणाचा ?’ बाळ म्हणाला, “ तुमचाच ”. स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरुशिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकीकदृष्ट्या पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. त्याच्या वृत्तीत पूर्णपणे उत्तम बदल झाला. जणू बाळास स्वामींनी ही दीक्षाच दिली. पुढे माता रूक्मांबा आपल्या दोन्ही मुलांसह गोधरा येथे परतल्या. पुढील जीवनचक्र सुरू झाले.

          प.पू. रंग अवधूत महाराज नेहमी म्हणत असत की – थोरल्या महाराजांचे चरणावर मी माझे मस्तक ठेवले, ते वर उचललेच नाही. त्यांनी दिलेल्या एका खडीसाखरेच्या प्रसादाच्या एका खड्याचा किती मोठा प्रभाव पडला, हे नारेश्वरचे ऎश्वर्य पाहून लक्षात येईलच. नारेश्वर येथे ते अखेरपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रत्ययकारी आणि रोकडी प्रचिती देणारी आहे. गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित या दत्तबावनीच्या पठनाने अनेकांचे आजार बरे झाले आहेत आणि विघ्ने दूर झाली आहेत. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांनी बापजी असेही म्हणत असत. रंगावधूत महाराजांनी अनेक चमत्कार आणि लील्या केल्या आहेत. त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव विलक्षण आहेत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष – निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

श्री अवधूत निवास ट्रस्ट, मु. नारेश्वर पो. सयार व्हाया अंकलेश्वर जि. बडोदा – ३९३१०७

फोन : (०२६६६) २५३२९३

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon