श्रीशंकर महाराज समाधी मंदिर, पुणे

          श्रीसद्गुरु शंकर महाराज हे दत्तसंप्रदायातील एक फार मोठे योगी सत्पुरूष होवून गेले. ते अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म मंगळवेढा येथील उपासनी नावाच्या घराण्यामध्ये झाला. त्यांचे आडनाव अंतापूरकर असे होते. श्रीशंकर महाराज यांचा अवतार रुद्रावतार होता. त्यांची भेदक दृष्टी अत्यंत तीव्र होती. त्यांच्या नजरेला नजर देणे अतिशय अवघड होते. त्यांच्या नजरेकडे पाहिल्यावर भीती वाटावी इतकी त्यांची नजर तेजस्वी होती. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिले तरीत्यांच्या नजरेला नजर देता येत नाही. सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेमध्ये सहजतेने वावरणारे आणि आत्मियतेने सर्वांना जवळ घेणारे असे त्यांचे चालणे बोलणे होते. त्यांच्या जन्म तारखेविषयी नक्की सांगता येत नाही. पण समाधी समयी १९४७ साली त्यांचे वय अंदाजे १५० वर्षे होते, असे सांगतात. सटाणा तालुक्यातील अंतापूर या गावामध्ये एक शंकराचे मंदिर होते. तेथे एक सुखवस्तू घराण्यातील स्त्री पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान करीत होती. वय उलटूनही तिला मूलबाळ झाले नव्हते. एकदा पूजा करीत असताना एक आठ वर्षाचे बालक अवधूतरुपामध्ये तिथे आले. त्याच्या शरीराला बाक आला होता. तो बालक तिच्या जवळ आला आणि त्याने तिला स्पर्श केला. तेव्हा तिला अचानक पान्हा फुटला. तेव्हा ती स्त्री म्हणाली की तू माझा मुलगाच आहेस. तू माझ्याजवळच रहा. तेव्हा ते बालक म्हणाले की तूला जूळी मुले होतील. तोपर्यंत मी तुझ्याजवळ राहील. मग मी निघून जाईन. शंकराच्या मंदिरामध्ये त्या बालकाची भेट झाली म्हणून त्याचे नाव शंकर असे ठेवले. त्या मुलाला सर्वजण शंकर म्हणूनच ओळखू लागले. कालांतराने त्या स्त्रीला जुळी मुले झाली. त्यानंतर शंकर महाराज तेथून बाहेर पडले.

सद्गुरु शंकर महाराजांचे जीवन अद्भूत लीलांनी भरलेले आहे. लहानपणी त्यांना प्लेग झाला. प्लेगचे चार गोळे अंगावर उठले होते. तेव्हा त्यांनी श्रीस्वामी समर्थांचा धावा केला. तेव्हा स्वामी धावून आले आणि त्यांनी हातात चक्र धरून ते चार गोळे कापून टाकले. या प्लेगमुळे मात्र त्यांचे शरीर जणू अष्टवक्रासारखे झाले. एका अतिशय अहंकारी व्यक्तीला त्यांनी ताळ्यावर आणले. ईश्वर वगैरे सगळे झूट आहे असे ती व्यक्ती म्हणत असे. एकदा शंकर महाराजांसमोर असे वक्तव्य केल्यावर त्यांनी त्या व्यक्तीच्या जीभेवर चिमूटभर भस्म ठेवले. त्याबरोबर ती व्यक्ती जणू मृतप्राय झाली. कोणतीही हालचाल करेना. तेव्हा सर्वजण घाबरले, महाराज शांत बसून होते. चार पाच तासानंतर ती व्यक्ती शुद्धीवर आली आणि तिने महाराजांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वांना शंकर महाराजांनी पांडुरंगाच्या रुपात दर्शन दिले होते. महाराज काही काळ तमाशामध्ये सोंगाड्याचे काम करीत असत. त्यावेळी चिलया बाळाच्या कथेवर वग नाट्य चालू होते. शंकराने आज्ञा केली. तेव्हा महाराजांनी त्या नाटकातल्या मुलाचे मुंडके खरोखर उडविले. तेव्हा लोकांनी गराडा घातला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केला. त्यांच्या कृपेने तो मुलगा पून्हा जिवंत झाला. तेव्हापासून त्यांनी तमाशा सोडला. स्वामी समर्थांनी त्यांना आज्ञा केली. तमाशामध्ये काम करायला तुझा जन्म झालेला नाही. तुझे शरीर वक्र आहे म्हणून तुझा तमाशामध्ये वापर करून घेतात. त्यात गुंतू नको. तमाशाचा नाद सोडून दे. तेव्हापासून महाराजांचे कार्य सुरु झाले. स्वत:बद्दल सांगताना एकदा शंकर महाराजांनी सांगितले,

मै कैलास का रहनेवाला I मेरा नाम है शंकर II

दुनिया को समझाने आया I करले कुछ अपना घर II

यह दुनियामें कई रंग है I यह रंग निराला है II

पाया न भेद किसने I यह गहराही गहरा है II

मुझे वोही जानता है I जो खुद को समझता है II

कुर्बान करी भी दौलत I तो भी सवाल अधुरा है II

समझे तो समझले I बाद में पछताना है II

हमारा क्या बिगडता है I सब तेराही नुकसान है II

लिखी पत्थर की दिवारों पर I सुन्ना की लकींरे II

वक्त आनेपर याद होंगे I हमारे ही फवारे II

 

          शंकर महाराजांचे अनेक शिष्य होते. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. डॉ. धनेश्वर, सरदार रावसाहेब मेहंदळे, प्रोफेसर भालचंद्र देव, चुन्निलाल मेहता, मोतीवाले लागू, खानसाहेब इ. अनेक जण त्यांचे शिष्य होते. एकदा चुन्निलाल मेहता त्यांचेकडे भारताचे शेवटचे व्याइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना घेवून आले होते. तेव्हा महाराजांनी त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन घडविले होते. तुम्ही सन्मानाने व्हाईसरॉय म्हणून निवृत्त व्हाल आणि इंग्लंडला परत जाल, असे त्यांना महाराजांनी सांगितले होते. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यांच्या ‘लास्ट डेज इन इंडिया’ या आत्मचरित्रामध्ये वरील गोष्टींचा उल्लेख केला आहे. शंकर महाराजांच्या वयाबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की शनीवार वाड्यामध्ये दुसऱ्या पेशवांच्या पंक्तीला जेवलो आहे. शंकर महाराज सिगरेट सेवन करीत असत. त्यांचे वर्तन विलक्षण होते. त्यांच्यासमोर खोटे बोललेले चालत नसे. त्यांची नजर भक्तांचे पाप जाळून काढत असे. ते खरेखुरे अवलिया होते. आजही त्यांच्या भक्तांना ते दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. शंकर महाराज समाधी मंदिर या ठिकाणी नित्य आरती, अनुष्ठान आणि पूजा अर्चा हे विधी होत असतात. तेथे त्यांच्या जीवनावरची प्रदर्शनी असून रोज अन्नदान केले जाते.

अधिक माहितीसाठी : श्री शंकर महाराज मठ, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे ४३

फोन : (०२०) २४३७३३०७

वेबसाईट : www.shankarmaharaj.org / www.shankarmaharaj.in

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon