top of page

श्री दत्तात्रेय

     पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी परमेश्वराने विविध अवतार धारण केले आहेत. प्रत्यक्ष परमेश्वर किंवा ईश्वरी शक्ती हीच पृथ्वीवर जेव्हा जन्म घेते आणि अत्यंत विलक्षण आणि अद्भुत कार्य करते तेव्हा परमेश्वराने अवतार घेतला अशी श्रद्धा आहे. ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता असून श्रीविष्णू हे पालनकर्ता आहेत आणि श्रीशंकर हे संहारकर्ता आहेत असे मानले जाते. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी या तीन देवांची कार्ये आहेत. दशावतार संकल्पनेमध्ये विष्णूचे दहा अवतार मानले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे: १. मत्स्य २. कुर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. श्रीराम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध आणि यापुढे होणारा कलकी अवतार याचबरोबर दुसऱ्या एका संकल्पनेमध्ये परमेश्वराचे बावीस अवतार मानले गेले आहेत. यात सृष्टीच्या प्रारंभीचा पहिला अवतार म्हणजे पुरुषोत्तम हा अवतार आणि त्यानंतर खालील अवतार मानले गेले आहेत.

१. पुरुषोत्तम २. ब्रम्हदेव ३. नारद ४. नरनारायण ५. कपिल महामुनी  ६. श्रीदतात्रेय  ७. यज्ञ  ८. वृषभदेव  ९. पृथू  १०. मत्स्य  ११. कूर्म  १२. धन्वंतरी १३. मोहिनी १४. नरसिंह  १५. वामन  १६. परशुराम  १७. व्यासमुनी  १८. श्रीराम  १९. श्रीकृष्ण  २०. बलराम  २१. बुद्ध  २२. कलकी

या संकल्पनेनुसार परमेश्वराचा सहावा अवतार हा श्रीदत्तात्रेयांचा आहे. इतर अवतारांपेक्षा श्रीदतात्रेय अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार चिरंतन, स्मर्तृगामी आणि नेहमी उपलब्ध असणारा असा आहे. 

     श्रीदत्तात्रेयांचा अवतारकाळ ईसवी सनापूर्वी दहा हजार वर्षे आहे. श्रीदत्तात्रेय यांना बहूतेक सर्व संप्रदायांनी आदिगुरु मानले आहे. त्यांचे रुप निर्गुण निराकार असून त्याने चराचराला व्यापून टाकले आहे. ते “ नित्यं शुद्ध निराभासं निराकारं आणि निरंजनम ” असे आहेत. श्रीदत्त अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त स्मरण केल्याने आणि आठवण  काढल्याने संतुष्ट होतात आणि इच्छीत फळ प्रदान करतात. वैराग्य आणि ज्ञान यांचे दान देणारा श्रीदत्त अवतार साक्षात भगवंत आहे. भग म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य देणारा देव म्हणजे श्रीदत्त भगवान आहेत. श्रीदत्तात्रेयांचे ऐश्वर्य म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहे. दत्तात्रेय हे महाभयनिवारणकारक आणि महाज्ञानप्रदायक आहेत. श्रीदत्तात्रेयांच्या उपासनेमुळे प्रारब्ध  कर्माचा नाश होते आणि भक्ताची जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्तता होते. म्हणूनच श्रीदत्तात्रेयांना नमन करताना “ हे ऊँ काररुप भगवान, केवल स्मरणाने संतुष्ट होणाऱ्या, मृत्यूसारख्या महाभयाचे निवारण करणाऱ्या, सच्चिदानंदरूपी महाज्ञान प्रदान करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांना नमस्कार असो. ” असे आवाहन केले जाते. सर्व देवांमध्ये गुरु म्हणून एकमेव ज्याचे स्मरण केले जाते आणि जो गुरुंचाही गुरु आहे असा  श्रीदतात्रेय अवतार आहे. हा सर्व ज्ञानाचा अधिष्ठाता आणि मार्गदर्शक असून त्याला म्हणूनच श्रीगुरुदेव दत्त असे म्हटले जाते. बृहस्पती हे देवांचे गुरु मानले जातात. परंतु श्री दत्तप्रभू सर्व विश्वाचे चराचराचे गुरु आहेत अशी श्रद्धा आहे.

99afe9d2cc41cd0568301afe8e593dfa.jpg

     श्रीदत्तात्रेयांच्या अवताराच्या जन्माबद्दल विविध कथा प्रचलित आहेत. यातील सर्वांना माहित असलेली कथा म्हणजे अनुसयेच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने सर्व चराचर सृष्टी व्यापून जाते. नारदमुनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना अनुसयेच्या सामर्थ्याचे वर्णन रंगवून सांगतात. त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि त्यांना अनुसयेचा मत्सर वाटू लागतो. म्हणून त्या तिघी आपल्या पतीदेवांना गळ घालतात की तुम्ही काही झाले तरी अनुसयेचे सत्वहरण करा. स्त्रीहट्टापुढे शरण जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश अतिथी रुपाने अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. अत्रि ऋषी आश्रमामध्ये नाहीत अशी वेळ साधून ते अनुसयेकडे इच्छाभोजनाची मागणी करतात. या इच्छाभोजनाची प्रमुख अट म्हणजे अनुसयेने कोणतेही वस्त्र न घालता भोजन वाढावे ही मागणी असते. अतिथी देवो भव यामुळे अतिथींची इच्छा न पुरवावी तर संकट आणि इच्छा पुरवावी तर पतिव्रत्याच्या तपश्चर्येचा लोप अशा दुहेरी संकटात अनुसया सापडते. अशावेळी ती अत्रि ऋषींचे स्मरण करते आणि अतिथींचे पाद्यपूजन करताना त्यांच्यावर जल शिंपडते. त्याक्षणी अतिथींचे रुपांतर सहा महिन्यांच्या बाळांमध्ये होते आणि ती तेथेच खेळू लागतात. अनुसयेला तेव्हा पान्हा फुटतो आणि ती त्या बालकांना दुग्धपान घडविते. त्याचवेळी अत्रि ऋषी आश्रमामध्ये परत येतात. त्यांना सर्व घटना अनुसया कथन करते. अत्रि ऋषी अंर्तज्ञानाने सर्व समजून चुकतात आणि प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश पुत्ररुपाने आपल्या घरी अवतरले याचा त्यांना मनस्वी आनंद होतो. इकडे सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती आपल्या पतीराजांना शोधत अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये पोहचतात तर त्यांना आपले पती कुठेही सापडत नाहीत. पाळण्यात असलेल्या बाळांकडे पाहून कुठला विष्णू, कुठला शंकर आणि कुठला ब्रह्मा ते त्यांना ओळखता येत नाही. शेवटी त्या महापतिव्रता अनुसयेला शरण जातात आणि आपले पती परत मिळावेत अशी याचना करतात. तेव्हा अत्रि आणि अनुसयेच्या अनुमतीने तिघेही देव मूळ स्वरुपामध्ये येतात आणि आपला अंश प्रत्येक बाळामध्ये ठेवतात. यातील ब्रह्माचा अंश म्हणजे सोम (चंद्र), विष्णूचा अंश म्हणजे दत्त आणि शंकराचा अंश म्हणजे दुर्वास. कालांतराने सोम आणि दुर्वास निघून जातात आणि श्रीदत्त अत्रि अनुसयेबरोबर राहतात. मात्र दत्तांबरोबर सोम आणि दुर्वास छाया रुपाने सतत राहतात म्हणून श्रीदत्तात्रेय हे त्रिमूर्ती मानले जातात.

(संदर्भ ग्रंथ: श्रीदत्त परिक्रमा, लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले)

bottom of page