top of page

श्री स्वामी समर्थ 

      श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक़्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ प्रसिद्ध आहेत. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक़्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. आपल्या अवतार काळात त्यांनी अनेक अगन्य लीला केल्या. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे आणि धर्माचे लोक त्यांचे भोवती गोळा झाले. त्याचे बाह्य आचरण काही वेळी बालक भावाचे तर काही वेळी अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भिडता, रचवक्तेपणा आणि आत्मीयता यामूळे लाखो भक्तांना त्यानी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजाचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या रवंय्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामिल होते. अक़्कलकोटला त्यावेळी संस्थानिक राजे श्री. मालोजीराजे भोसले हे होते. त्यांचेवर स्वामींनी कृपा केली. संपूर्ण देशातून आणि विदेशातून त्यांना भेटायला भक्तगण येत असत. सर्वांना भेटणारे, सहज उपलब्ध असणारे आणि सर्वांची मायेने विचारपूस करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अद्भुत होते. ते अजानबाहू असून त्यांची उंची ६ फूटांहून जास्त होती. त्यांचेभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पतका दिली.

     श्रीस्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्री नृसिंहसरस्वती, श्री शंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्री गजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरु केली आहेत. श्रीस्वामींची बखर या ग्रंथामध्ये स्वामींचे जीवनचरित्र, त्यांनी केलेल्या लीला यांचे वर्णन पहावयास मिळते.

Swami Samarth.jpg
bottom of page