top of page

 कर्दळीवन - ओळख आणि माहात्म्य

      श्रीदत्त संप्रदाय आणि श्रीस्वामी समर्थ संप्रदाय यांमध्ये कर्दळीवनाचे विलक्षण माहात्म्य आहे. कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाजवळ आहे. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले. गुरुचरित्रामध्ये असा कथाभाग आहे की श्रीनृसिंहसरस्वती हे १३ व्या शतकात श्रीशैल्य जवळील पाताळगंगेच्या पात्रात एका बुट्टीत बसून कर्दळीवनात गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप:साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती एक वारुळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकुडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होऊन त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारुळातून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. श्रीशैल्य या ज्योतिर्लिंगाजवळ कृष्णा नदी पाताळगंगा रूपाने जवळजवळ २०० कि.मी.वाहते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि अत्यंत दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ.स.२०१२ हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचु या जमातीचे आदिवासी लोक रहात आहेत.

      कर्दळीवनासंबंधी अनेक समजअपसमज आणि श्रध्दा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते .कर्दळीवनात जायला अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १व्यक्ती काशी –रामेश्वरला जाते, १० लाखांतून १ बद्री केदारनाथला जाते, २५ लाखांतून १ नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून १ कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही.

        कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिध्दांची भूमी आहे. नागार्जुन ,रत्नाकर इ. सिध्दांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रुपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवनात विलक्षण अदभुत आणि दैवी अनुभव येतात. कर्दळीवनाची माहिती इ.स.२००९ पासून हळूहळू होऊ लागली. कर्दळीवन पंच परिक्रमा पुर्ण केलेल्या परिक्रमार्थींना आलेल्या अनुभूती अत्यंत विलक्षण आहेत. त्यांचे व्यक्तिगत, कौटुंबिक तसेच आध्यात्मिक आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. श्रीदत्त प्रभु आणि श्रीस्वामी समर्थांची कृपादृष्टी आणि प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास अशाही अनुभूती अनेकांना आल्या आहेत. हे स्थान इतके वर्ष का गुप्त होते आणि आत्ताच ते का प्रकट झाले, हे न सु‍टणारे कोडे आहे.

        कर्दळीवनात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती समाधिस्त झाले आणि श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. तेथे जाणा-या भक्तांसाठी अनुष्ठान सेवा करण्यासाठी सुविधा नाहीत. त्यांचेसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, नियम नियमावली नाही. "कर्दळीवन: एक अनुभुती " या पुस्तकाचे वाचक, भक्त आणि कर्दळीवन पंच परिक्रमा पूर्ण केलेल्या अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आहे . त्याची अधिकृत नोंदणी झाली असून त्याचा नोंदणी क्र. ई - ६५८७ असा आहे. कर्दळीवनासंबंधी जनमानसात, भाविक भक्तजनांत जागृती निर्माण व्हावी, अधिकाधिक व्यक्तींनी कर्दळीवनास भेट द्यावी, या उद्देशाने कर्दळीवन सेवा संघ ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर तेथे सोयी, सुविधा निर्माण व्हाव्यात, नियमित पूजा - अर्चा व्हावी, एक सुनियोजित व्यवस्था निर्माण व्हावी असा प्रयत्न कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे. हे श्रीदत्तात्रेयांचे आणि श्रीस्वामींचे कार्य आहे, अशा श्रध्देने सर्वजण काम करीत आहेत. या कार्याला अनेक सत्पुरुषांचे आशिर्वाद लाभलेले आहेत.

bottom of page