top of page
Search

अंगकोरवाट विष्णूधाम आणि कंबोडिया अर्थात कंबुज प्रदेश


हिंदू मंदिराला आपल्या राष्ट्रध्वजावर स्थान देणारा आणि हिंदू मंदिराचे चित्र रियाल या आपल्या चलनी नोटेवर छापणारा कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे. पूर्णत: हिंदू मंदिरांवर आणि त्यामुळे विकसित झालेल्या पर्यटन संस्कृतीवर कंबोडियाचे आजचे अर्थकारण चालते. कंबोडिया हा देश आजच्या थायलंड आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये आहे. एका बाजूला समुद्र आणि इतर सीमांवर लाओस, व्हिएतमान आणि थायलंड या देशांच्या सीमा कंबोडियाला लागून आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकात ( इ. स. ६५ च्या सुमारास ) कौंडिण्य नावाचा एक तरूण आणि साहसी नाविक १४ – १५ जहाजांचा ताफा घेऊन दक्षिण भारतातून कंबोडिया देशात जाणारा पहिला भारतीय होता. त्याने तेथिल नागवंशाच्या सोमा नावाच्या राजकन्येशी विवाह केला आणि मेकांग नदीच्या खोऱ्यात फूनान नामक एका हिंदू राज्याची स्थापना केली. फूनान, चेन-ला आणि ख्मेर या राजघराण्यांनी प्राचीन देशावर राज्य केले. प्राचीन अंगकोर साम्राज्य हे याच ठिकाणी वसलेले होते. भारताप्रमाणेच कंबोडियातदेखील मंदिरे बांधली गेली. भारतातून सतत पंडित, विद्वान, स्थपती हे कंबोडियात जात होते आणि इथले ग्रंथ आणि स्थापत्य यांचे परस्पर आदान-प्रदान सुरू होते. कंबोडियाच्या मंदिरस्थापत्यावर दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. ‘ महामेरू ’ या संकल्पनेप्रमाणे संपूर्ण मंदिरच मेरू पर्वतासारखे बांधण्याचे प्रयोग तेथेही केले गेले.

भारतापासून कंबोडिया हे अंतर सुमारे ५००० किलोमीटर एवढे आहे. भारतातून कंबोडियाला जाण्यासाठी थायलंड येथील बँकॉक येथे विमानाने जावे लागते. साधारणपणे मुंबई येथून पाच ते साडेपाच तासांचा हा विमान प्रवास आहे. कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह हि असली तरी मंदिरे, स्थापत्य आणि पर्यटन यासाठी सियाम रिप याठिकाणी जावे लागते. बँकॉक येथून सियाम रिप येथे जाण्यासाठी विमानाने ५० ते साठ मिनिटे लागतात.

कम्बोडिया येथील प्रेक्षणीय ठिकाणे

अंगकोरवाट विष्णूधाम – जगातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ – श्रीविष्णू मंदिर -

युनेस्कोचा जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेले, ख्मेर साम्राज्याचे अलौकिक भूषण आणि जगातील सर्व धर्मियांमधील सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणून अंगकोरवाट मंदिराची जगभर ख्याती आहे. संकल्पना, रचना, स्थापत्य या सगळ्या बाबतीत भव्य आणि अवाढव्य हा शब्दही अपुरा पडेल असे हे अद्भुत आणि विलक्षण मंदिर आहे. ख्मेर राजा सूर्यवर्मन दुसरा ( इ.स. १११३ – ११८१ ) याने हे मंदिर बांधले. या मंदिरात जाण्यासाठी चारही बाजूंनी भले मोठे खंदक असून त्यावर दगडी पूल बांधलेले आहेत. हे मंदिर ५१० एकर एवढ्या प्रचंड परिसरात बांधलेले आहे. मंदिरात जातानाच्या मार्गावर एकेका टप्प्यावर एक अशा तटबंदी आहेत. येथील आठ हातांची विष्णू मूर्ती जवळजवळ १५ फूट उंच आहे. मंदिराच्या आतमध्ये जी तटबंदी आहे ती दगडी भित्तिचित्रांनी मढवलेली आहे. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला विळखा घातला आहे. या तटबंदी एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. त्यांची रचना पिरॅमिड सारखी असून आभाळात उंचच उंच गेलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले चार कळस अशी मुख्य मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिर २२० फूट उंच आहे. या मंदिरात १० फूट उंच आणि ३०० फूट लांब असे ८ शिल्पपट आहेत. हे मंदिर पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,००० आणि 'अंगकोर वाट'ची लोकसंख्या होती दहा लाख !

बलून मधून अंगकोरवाट दर्शन -

मुख्य मंदिरापासून अंदाजे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर या मंदिराचे आकाशातून भव्य दर्शन घेण्यासाठी एक मोठा बलून आकाशात सोडलेला आहे. पतंगाप्रमाणे असणारा हा बलून एका मोठ्या लोखंडी दोरखंडानी बांधला आहे. त्यावर असणाऱ्या गोलाकार गॅलरीजवळ लोकांना करून हा बलून २०० मीटर आकाशात वर जातो. तेथून आपल्याला अंगकोरवाट मंदिराचे अद्भुत आणि विलक्षण दर्शन होते. हा एक थरारक आणि रोमांचक अनुभव आहे.

अंगकोरथॉम आणि बयोन -

ख्मेर सम्राट जयवर्मा - ७ याच्या राजधानीचे ठिकाण म्हणजे अंगकोरथॉम. जवळजवळ ९ वर्ग किलोमीटर एवढ्या परिसरात पसरलेल्या या राजधानीमध्ये राजाने विविध देवळे बांधली. संपूर्ण अंगकोरथॉम परिसराला दगडी तटबंदी आहे. त्याभोवती खंदक खोदलेला आहे. या खंदकावरून प्रवेश करण्यासाठी दगडी पूल बांधले आहेत. या पुलाच्या कठड्यावरून समुद्रमंथनाच्या प्रतिक असलेला नाग आणि देव - दानव यांच्या मोठ्या आकारातल्या मूर्ती कोरून ठेवल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ जे शिखर आहे त्या शिखरावर चारही बाजूंनी मानवी चेहरे दिसतात. या परिसरातच त्याने बयोन नावाचे एक भव्यदिव्य मंदिर बांधले आहे. हे अगदी मुद्दाम आणि आणि आवर्जून पाहण्यासारखे आहे. मुख्य मंदिराच्या शिखराभोवती त्याने ५० हून अधिक मनोरे बांधले आणि त्या प्रत्येक मनोऱ्याच्या शिखराभोवती लोकेश्वर बुद्ध या देवतेचे चेहरे दगडात कोरून चार दिशांना बसवले. सध्या त्यातले ३७ च मनोरे शिल्लक आहेत. अतिशय आकर्षक असे हे स्थापत्य आहे. मंदिराच्या शिखरासारखा असलेला भाग आणि त्यावर कोरलेले मानवी चेहरे हे जगात इतरत्र कुठेही नाहीत.

थाऊजंड लिंगा दर्शन, कबाल स्पिअन -

सीएम रीप पासून ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. सीएम रीप नदी या डोंगरावरून खाली येते आणि पुढे सीएम रीप शहराकडे जाते. इथे डोंगरमाथ्यावर खडकात हजारो शिवलिंग खोदलेली आहेत. ही शिवलिंग नदीपात्रात खोदलेली असल्यामुळे या नदीला सहस्रलिंग नदी असेही नामकरण केले गेले आहे. या शिवलिंगासोबत ब्रह्मदेवाचे अंकन इथे नदीपात्रातल्या खडकावर केलेले आहे. पण इथे बघण्यासारखे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या शेषशायी विष्णूच्या प्रतिमा. ज्या खडकावरून ही नदी वाहते त्या खडकावर शेषशायी भगवान कोरलेले आहेत.

बंटी श्राई मंदिरे :

इ. स. १० व्या शतकात ख्मेर राजवटीमधील राजेंद्र वर्मा दुसरा ( इ.स. ९४४ - ९६८) हा राज्य करीत होता. त्याच्या काळात बंटी श्राई मंदिरे बांधलेली आहेत.

बंटी श्राई हे मंदिर कोरीव कामाच्या दृष्टीने सर्वांत विशेष आहे. इतके बारीक आणि सुबक काम आहे की जणूकाही ते लाकडात कोरल्यासारखे वाटते. या कामासाठी त्याकाळी कुशल शिल्पी मुद्दाम भारतातून बोलावून आणले होते, असे त्या मंदिरातल्या एका शिलालेखात लिहिले आहे. या मंदिरात खांडववन दहन, सीतेचे अपहरण, कंसवध, हिरण्यकशिपू वध, कैलासतोलन, कामदेवदहन, तारा विलाप अशी अत्यंत विशेष शिल्पे कोरलेली आहेत.

ता प्रोम आणि प्री खा वृक्षमंदिरे -

सातव्या जयवर्यन राजाने बांधलेली ही बौद्ध मंदिरे आहेत. याठिकाणी प्रज्ञा परमिता या देवीचे मंदिर आहे अशी मान्यता आहे. साधारण १२ व्या शतकात बांधलेली मंदिरे आहेत. जवळजवळ ४०० वर्षे सगळा अंगकोर साम्राज्याचा परिसर संपूर्णपणे दुर्लक्षित राहिला होता. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ऑरी माऊ हा काही वनस्पतींच्या शोधासाठी इथे फिरत असताना त्याला मंदिराचे अवशेष आढळले. त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने ते स्वच्छ करून घेऊन एक एक मंदिर त्या झाडांच्या दाटीतून बाहेर काढले. अशा प्रकारे असंख्य मंदिरे उघडकीला आली. जवळजवळ ४०० वर्षे संपूर्णपणे झाडीत असलेली हि मंदिरे, त्यांच्या अवतीभोवती झाडांच्या मुळांच्या विळखा पडला होता. ता प्रोम या ठिकाणी सर्व बाजूंनी झाडांनी वेष्टीलेली मंदिरे आहेत. भोवतालची झाडे तोडली तर मंदिरेसुद्धा कोसळतील. म्हणून ती झाडे तशीच ठेऊन ही मंदिरे मोकळी केलेली आहेत. कंबोडिया सरकारने वृक्ष मंदिरे असे यांचे नामकरण करून पर्यटकांना आकर्षित केले आहे. ता प्रोम मंदिरांना भेट देताना आपण कधी झाडाच्या ढोलीतून तर कधी त्याच्या फांद्यांच्या संभारामधून जातो तेव्हा विलक्षण अनुभव येतो.

अंगकोरवाट नॅशनल म्युझियम -

म्युझियम हे त्या त्या प्रदेशाची संस्कृती, इतिहास, कला आपल्या समोर उलगडून दाखवत असतात. सीएम रीपचे म्युझियम सुद्धा असेच नितांत सुंदर आहे. ख्मेर राजवटी, त्यातले मोठेमोठे राजे, त्यांनी केलेली कामे अशा अनेक गोष्टी इथे विविध दालनातून मांडून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक राजवटीमधील ठळक वैशिष्टये, त्यांच्या काळातील सापडलेले अवशेष इथे खूप सुरेख मांडून ठेवले आहेत. त्याचसोबत १००० बुद्ध मूर्ती असलेले दालन तर केवळ प्रेक्षणीय आहे. विविध काळात बुद्ध मूर्ती कश्या घडवल्या जात असत. त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये कसे बदल होत गेले याचे सुंदर दर्शन या दालनात आपल्याला होते.

कम्बोडिया वॉर म्युझिअम -

कंबोडियामध्ये १९७५ ते १९७९ या दरम्यान स्थानक युद्धामध्ये यादवी माजली होती. पॉल पोट नावाच्या हुकुमशहाने माजवलेल्या अंतर्गत बंडाळीत त्यावेळी ३० लाखांहून अधिक लोक मारले गेले. त्यांचे अवशेष, युद्धसामग्री, विमाने, तोफगोळे यांचे दर्शन वॉर म्युझिअम मध्ये होते. हिटलरला लाजविल अशा प्रकारचे नृशंस हत्याकांड त्यावेळी कंबोडियामध्ये झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण जगाला त्याचा पत्ताही लागला नाही. याच कारणामुळे आज कंबोडियामध्ये महिलांची संख्या पुरूषांपेक्षा खूप जास्त आहे.

टोनले सॅप ( तरंगते गाव ) नो मॅन्स लॅंड –

टोनले सॅप हि एक फार मोठी नदी असून तिचा विस्तार समुद्राएवढा मोठा आहे. कित्येक मैल पसरलेल्या या नदीत बारमाही पाणी असते. याला गोड्या पाण्याचा समुद्र असेही गमतीने म्हटले जाते. या नदीवरच तरंगते गाव वसलेले आहे. हे जगातील एक मोठे आश्चर्य आहे. अमेरिका आणि व्हिएतनाम यादवी युद्धामध्ये अनेक व्हिएतनामी नागरीक जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळाले. त्यांनी जवळपासच्या देशांचा आश्रय घेतला. त्यातील अनेक लोक होड्या आणि छोट्या बोटीतून टोनले सॅप मध्ये आले. त्यांनी कंबोडियामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलिसांनी त्यांना अटकाव केला. शेवटी त्यांनी टोनले सॅप नदीतच आश्रय घेतला आणि ते तिथेच वसती करून राहिले आहेत. त्यांच्या कडे कोणताही रहिवासी पुरावा नाही. म्हणून त्यांना नो मॅन्स लॅंड वरील नागरीक असे म्हटले जाते.

अप्सरा नृत्य नाटिका –

अप्सरा या कंबोडियाच्या राष्ट्रिय अभिमानाच्या आणि संस्कृतीच्या मुकुटमणी आहेत. अंगकोरवाट मंदिरातही सुमारे दोन हजारहून अधिक अप्सरा कोरलेल्या आहेत. तेथिल प्रत्येक मंदिर आणि स्थापत्यामध्ये अप्सरा हा एक अविभाज्य भाग असतो. त्या अप्सरांचाच खुबीने वापर करुन अप्सरा नृत्य हा एक लोकप्रिय नृत्य नाटिका प्रकार तेथे सादर केला जातो. एका मोठ्या सभागृहात / प्रेक्षागृहात व्यासपीठावर अप्सरा नृत्य नाटिका सादर केले जाते. यामध्ये स्थानिक प्राचिन वादकांचा चमू असतो. तो प्रथम विविध प्रकारची वाद्ये वाजून दाखवतो. त्यानंतर ररंगमंचावर साक्षात अप्सरा अवतीर्ण होतात आणि आपल्या मोहक अदाकारीने आणि लालित्याने बहारदार नृत्ये सादर करतात. रंगमंचासमोर बसून आपल्याला त्यांचा आनंद घेता येतो.

4,852 views0 comments

Comentários


bottom of page